Father Emotional Video : बाप हा शब्द अनेकांसाठी आधार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील आईची जागा कोणी घेऊ शकत नाही तशी बापासारखे जबाबदारीचे ओझे कोणी पेलू शकत नाही. घरातल्या प्रत्येकाला खूश ठेवण्यासाठी झगडणारा बाप आयुष्यभर स्वत:साठी जगणं विसरुन जातो. स्वत:च्या पायातली चप्पल तुटली तरी चालेल पण लेकरांना ब्रँडेड शूज घेऊन देणारा हा बाप असतो. स्वत: फाटके कपडे घालेल पण पोरीला कॉलेजला जायला नवी कपडे घेण्यासाठी पैसे देणारा बाप असतो. परिस्थिती कितीही बिकट असो, स्वत: कष्ट करुन पोरांबाळांचे पोट भरणारा आणि स्वाभिमानाने जगणारा हा बाप असतो. अशाच कष्ट उपसणाऱ्या स्वाभिमानी बापाचा एक अतिशय भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही, कारण व्हिडीओतील दृश्य इतके बोलले आहे की,यातून अनेकांना त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी लहानपणापासून उपसलेल्या कष्टाची जाणीव होईल.

बाप कुटुंबासाठी रात्रीचा दिवस करुन पैसा कमावतो. का तर मुलं चांगली शिकून मोठी व्हावीत. पण मुलांना मोठी करण्याच्या नादात तो आपलं सुख विसरतो. वेळीप्रसंगी मिळेल ती नोकरी करतो. शिक्षण नाही म्हणून रडत बसत नाही, कोणतही काम छोटं न समजता, लाज न बाळगता तो निमूटपणे करतो. अशाच स्वाभिमानी आणि जबाबदार बापाचा संघर्ष या व्हिडीओतून दिसून येतोय.

तरुणांनो वाईट मार्गाला जाण्याआधी आई-बाप कोणत्या परिस्थितीत जगतात हे लक्षात घ्या

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की,रात्रीची वेळ आहे, रस्त्यावरील अनेक दुकानं बंद झालीत. पण रस्त्याच्या कडेला एक मोठं लॅविश हॉटेल मात्र सुरु आहे, याच हॉटेलच्या अगदी बाहेर काही वाहनं पार्क केली आहे, याच वाहनांमधील सायकलवर डब्बा अन् पाण्याची बाटली ठेवून एक सुरक्षा रक्षक उभ्याने जेवत आहे. हे चित्र फारचं बोलकं आणि काळजाला चटका लावणारे आहे. आयुष्यात संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला असतो पण या व्हिडीओमध्ये एका बापाचा कुटुंबासाठीचा हा संघर्ष पाहून डोळे भरुन येतात. कारण जेवणासाठीही नीट जागा नाही म्हणून उभ्याने तो सायकलवर डबा ठेवून जेवतोय. समोर अलिशान हॉटेल पण तो अशाप्रकारे रस्त्यावर उभं राहून जेवताना पाहून फार दुख वाटतं. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तरुणांनो वाईट मार्गाला जाण्याआधी आपले आई-बाप कोणत्या परिस्थितीत जगतात हे लक्षात घ्या, अशी विनंती केली आहे. तर अनेकांनी या व्यक्तीच्या स्वाभिमानाला सलाम केला आहे.

लेकरांसाठी बापाचा संघर्ष, व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

आपल्या आजूबाजूलाही अनेक अशा व्यक्ती असतात ज्या परिस्थितीने गरीब असतात पण स्वाभिमानाने कष्टाचे कमवून आपलं पोटं भरतात. कोणासमोर हात पसरण्यापेक्षा मेहनत करुन कुटुंब सांभळतात, जे पाहताना आपल्यालाही आनंद होतो.

VIDEO: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही अनेकांना वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर; लोक म्हणाले, “जगात निस्वार्थी प्रेम…”

हा भावनिक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @vansharora22 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर अनेकजण वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, “ते काम करुन कष्टाचे खात आहे, त्यांचा अभिमान आहे”. दुसऱ्या एकाने लिहिले की,”मेहनत करुन कमावलेली भाकरी खाण्याचा एक वेगळा आनंद असतो”. तिसऱ्या एकाने लिहिले की, “एक वडील आपल्या पोरांसाठी मेहनत करत आहे, सॅल्युट आहे अशा वडिलांना”. तर अनेकांनी अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीची व्हिडीओ बनवून पोस्ट करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे, पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये जरुर कळवा.