देशभरात आज राखी पौर्णिमा उत्साहाने साजरी केली जात आहे. बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा हा दिवस. दरम्यान, राखी पौर्णिमेच्या दिवशी एका बहिणीने आपल्या भावाला अमूल्य भेट दिली आहे. नवी मुंबईमधील २१ वर्षीय तरुणीने तिच्या यकृताचा एक भाग भावाला दान केला आहे; जो ऑटोइम्युन लिव्हर सिरोसिस (Autoimmune Liver Cirrhosis) आजाराचा सामना करीत आहे. यकृत दान करून, या बहिणीने भावाला रक्षाबंधनानिमित्त मौल्यवान भेट दिली आहे. नवी मुंबईच्या मेडिकोव्हर हॉस्पिटल्सच्या संचालकांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने ही यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी (Liver Transplantation and HPB Surgery) शस्त्रक्रिया केली.
बहीण नंदिनी पाटील ही सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे; तर भाऊ राहुल पाटील इयत्ता १० वीमध्ये शिकत आहे. राहुलला जेव्हा अशक्तपणा जाणवू लागला आणि अचानक रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या, तेव्हा पाटील कुटुंबाला धक्का बसला. त्यांनी स्थानिक डॉक्टरांची मदत घेतली; पण अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. अखेरीस नवी मुंबईतील मेडिकोव्हर हॉस्पिटल्समध्ये त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. जिथे त्यांना राहुलला ऑटोइम्युन लिव्हर सिरोसिस हा आजार आहे आणि त्याला यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे, असे समजले. राहुलच्या आजाराबाबत ऐकून त्याच्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली.
मेडिकोव्हर हॉस्पिटल्सचे लिव्हर ट्रान्सप्लांटेशन आणि एचपीबी सर्जरीचे संचालक डॉ. विक्रम राऊत यांनी सांगितले, “ऑटोइम्युन लिव्हर डिसीजमध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक यंत्रणा त्याच्या स्वतःच्या यकृताच्या पेशींविरुद्ध कार्य करण्यास सुरू करते. लवकर निदान झाल्यास औषधांनी उपचार केले जाऊ शकतात; परंतु राहुलच्या बाबतीत त्याचे निदान उशिरा झाले आणि त्याला वारंवार रक्तस्राव, जलोदर (असायटीस- ओटीपोटात असामान्य पाणी होणे) व कावीळ यांसारख्या गुंतागुंतीच्या समस्यांचा त्रास होत होता. त्यामुळे त्याला यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. त्याच्या आईला HbsAg पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आणि त्यामुळे तिला दाता (Donor) म्हणून नाकारण्यात आले. परंतु, त्यांची २१ वर्षीय बहीण नंदिनी पाटील हिची संपूर्ण तपासणी झाल्यानंतर ती यासाठी पात्र ठरली.”
हेही वाचा –जंगलामध्ये हत्तीला सापडले ड्रग्ज, पुढे जे घडलं ते व्हिडीओमध्ये झाले कैद
डॉ. राऊत पुढे म्हणाले, “रुग्णाच्या बहिणीने निर्भयपणे तिच्या भावाचा जीव वाचवण्यासाठी तिच्या यकृताचे दान केले. आम्ही यकृताचा आकार आणि यकृताची गुणवत्ता तपासली; जी राहुलच्या यकृताशी पूर्णपणे जुळत होती. त्याच्यावर वेळीच उपचार न केल्यास जीव गमवावा लागला असता. प्रत्यारोपणासाठीची मुख्य अडचण आर्थिक स्थिती होती; परंतु मेडिकोव्हर हॉस्पिटल्स आणि इतर सेवाभावी संस्थांनी त्याच्या प्रत्यारोपणाला पाठिंबा दिला. २६ जून २०२३ रोजी नंदिनी यांनी आपल्या भावाचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या यकृताचा महत्त्वपूर्ण भाग नि:स्वार्थीपणे दान केला आणि एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले.”
याबाबत रुग्णाची बहीण नंदिनी पाटील यांनी सांगितले, “माझा भाऊ म्हणजे माझ्यासाठी जग आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी मी त्याला एक मौल्यवान भेट देऊ शकले याचा मला खूप आनंद झाला आहे. अनेक महिन्यांपासून त्याच्या प्रकृतीबद्दल आम्ही सर्व जण अत्यंत चिंतेत होतो. मी डॉक्टरांची आभारी आहे. माझा भाऊ आता त्याची स्वप्नं पूर्ण करू शकतो.”
तर रुग्ण राहुल पाटील याने सांगितले, “माझ्या बहिणीने मला राखीनिमित्त ही भेट देऊन मला आश्चर्यचकित केले. तिचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी असताना तिनेच माझे संरक्षण केले आहे. माझी बहीण माझा आधार आहे आणि कठीण काळात तिच्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि नेहमीच कृतज्ञ राहीन, असे वचन देतो. तिने मला एक मौल्यवान भेट दिली आहे आणि तिच्या दयाळूपणामुळे माझे आयुष्य खूप सुधारले आहे. मी तिच्याबद्दल पुरेशी कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. ती माझी तारणहार आहे.”
हेही वाचा – हाजमोला चहाचा Viral video पाहून चहाप्रेमीं झाले नाराज, म्हणाले ”चहाचा अपमान…”
बहीण-भाऊ अशा या दोघांचीही आरोग्य स्थिती आता चांगली आहे. अवयवदान ही एक शक्तिशाली गोष्ट आहे; ज्यामुळे एखाद्याच्या आयुष्यामध्ये मोठा बदल होऊ शकतो. डॉक्टर प्रत्येकाला अवयवदाता होण्यासाठी आणि त्यांच्या प्रियजन व गरजूंचे जीवन वाचविण्यात मदत करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देत असतात.