अमेरिकेतील अटलांटा प्राणीसंग्रहालयातील आश्चर्यकारक व्हिडिओ समोर आला आहे. एक चिमुकला सिंहासोबत खेळताना या व्हिडिओत पाहायला मिळतो. एका छोट्या मुलाने सिंहाचा पोशाख परिधान केला आहे आणि काचेच्या पलिकडील सिंहाना तो न्याहाळत आहे. सिंह मुलाच्या जवळ येऊन काचेच्या भिंतीवर पंजे मारत मुलाशी खेळतात. दरम्यान चिमुकला सिंहाना बघत असल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. जसजसा चिमुकला रांगत पुढे जायला लागतो तसतसा सिंहदेखील त्याच्यासोबत पुढे जायला लागल्याचे व्हिडिओच्या शेवटच्या दृश्यात पाहायला मिळते.
“मी आणि माझा जवळचा मित्र या बालकासोबत फॅमिली आऊटिंगसाठी अटलांटा प्राणीसंग्रहालयात गेलो होतो. आमच्यासोबतच्या चिमुकल्याने सिंहाचा पोशाख परिधान केला होता. आम्ही तेथे पोहोचलो तेव्हा पहिल्यांदा तेथे सिंह नव्हता. अन्य प्राणी पाहिल्यानंतर आम्ही सिंहाला पाहण्यासाठी थांबून राहिलो. जेव्हा सिंह बाहेर येत असल्याचे आम्ही पाहिले. आमच्यासोबतच्या सिंहाच्या पोशाखातील चिमुकल्याचे खरोखरच्या सिंहासोबत फोटो काढण्याचा विचार आमच्या मनात आला. चिमुकल्याला पाहाताच सिंह त्याच्यासोबत खेळायला लागला. आमच्यासाठी तो आनंददायी क्षण होता. हा अविस्मरणीय क्षण आम्ही कॅमेऱ्यात कैद केला.” असा संदेश या व्हिडिओ पोस्टसोबत देण्यात आला आहे.
दरम्यान, सिंहाने लोकांवर हल्ला केल्याचे वृत्त याआधी अनेकवेळा आलेले आहे. अलीकडेच इजिप्तमधील एका सर्कशीचा व्हिडिओ प्रसिध्द झाला होता. ज्यात सिंहाने ट्रेनरवर हल्ला चढविल्याचे पाहायला मिळाले होते. सिंहाच्या हल्ल्यात त्या ट्रेनरने आपले प्राण गमावले. सिंह ट्रेनरवर हल्ला करून त्याला जमिनीवर पाडतो. त्यानंतर ट्रेनरची मान आपल्या जबड्यात पकडतो. दरम्यान हल्लेखोर सिंहाला काबूत आणण्यासाठी आणि ट्रेनरला सिंहाच्या तावडीतून सोडविण्यासाठी अन्य ट्रेनर सिंहाला छडीने मारण्यास सुरुवात करतो, असे दृश्य या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. सर्कस पाहायला आलेल्या मुलांच्या किंकाळ्यादेखील या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतात.
व्हिडिओ