जंगल सफारीच्या दरम्यान एखादा तरी वाघ किंवा सिंह नजरेस पडावा अशी किमान अपेक्षा या पर्यटकांची असते. त्यामुळे अनेक पर्यटक यासाठी हवी तेवढी रक्कम मोजायला तयार असतात पण असा हट्ट भलताच महागात पडू शकतो याची प्रचिती बंगळुरुमधल्या राष्ट्रीय उद्यानात जंगल सफर करताना काही पर्यटकांना आली.
वाचा : सौदी युवराजांच्या ८० ससाण्यांची विमान सफर व्हायरल
बंगळुरुमधल्या बारहाट राष्ट्रीय उद्यानात जंगल सफारीदरम्यान सिंहांना अधिक जवळून पाहता यावे यासाठी काही पर्यटकांनी छोटी गाडी आरक्षित केली होती. या गाडीने जंगलात सफर करताना त्यांना राजांचे दर्शन झाले खरे पण राजांचे हे रुप पाहून आनंदित होण्यापेक्षा या पर्यटकांनी देवाचा धावा करायला सुरूवात केली. त्याचे झाले असे की जंगलाच्या रस्त्यात दोन सिंह उभे होते. या गाडीला पाहताच एका सिंहाने गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात कदाचित गाड्यांच्या काचा तुटून पर्यटक जखमीही झाले असते पण हा प्रसंग तेवढ्यावर निभावला. सिंहाचे हे आक्राळ रुप पाहून पर्यटकांनी आरडा ओरडा सुरू केला. चालकाने प्रसंगावधानता दाखवून गाडी थोडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. शेवटी सिंहानेही थोडे नमते घेत माघार घेतली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा : कुटुंबासमोर वाघांनी केली त्याची शिकार
जंगल सफारीसाठी मोठ्या गाड्यांची सोय करण्यात आली आहे पण काही पर्यटक जास्तीचे पैसे मोजून या गाड्यांनी न जाता छोट्या गाड्यांनी प्रवास करतात. अशा गाड्यांनी प्रवास करणे धोक्याचे असते पण तरीही हट्टापायी पर्यटक अशाच गाड्यांना पसंती देतात. सुदैवाने गाडीत बसलेल्या पर्यटकांना या दोन्ही सिंहानी कोणतीही हानी पोहोचवली नाही. मागून येणा-या एका गाडीमधील पर्यटकांनी हा व्हिडिओ काढला असून आता तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
VIDEO : १८ सिंहांच्या ‘शाही भोजना’ने रस्त्यात झाली वाहतूक कोंडी