देशात दारू पिणार्यांची संख्या कमी नाही त्यामुळे दारु दुकानातून खरेदी करण्यासाठी दारु पिणाऱ्यांना अनेकदा गर्दीचा सामना करावा लागतो. शिवाय कधी कधी तर MRP पेक्षा जास्त किनंत देऊन त्यांना दारु खरेदी करावी लागते. अशा अनेक समस्या दारु पिणाऱ्यांच्या असतात. पण सध्या तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये दारू खरेदी करणे खूप सोप्पे आणि हायटेक झाले आहे. कारण दारू खरेदी करणाऱ्यांसाठी येथील एका मॉलमध्ये सरकारी दारु विक्री मशीन बसवण्यात आली आहे. त्यामुळे आता लोक ज्याप्रकारे एटीएम मशीनमधून पैसे काढतात त्याप्रमाणे या मशीनमधून ते दारू खरेदी करू शकतील.
तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (Tasmac) ने चेन्नई येथील एका मॉलमध्ये एलीट स्टोअरमध्ये एक स्वायत्त दारु वेंडिंग मशीन बसवली आहे. या मशीनवर दारु खरेदीदार पैसे देण्यापूर्वी त्यांच्या आवडीची दारु निवडू शकतात आणि मशीनच्या स्क्रीनवर दिसणारी बाटली गॅझेटमधून प्राप्त करू शकतात. त्यामुळे काउंटरवर दारुसाठी जास्त पैसे घेतले जातात या लोकांच्या तक्रारी कमी होऊ शकतात. या मशीनद्वारे एमआरपीवरच दारूची विक्री करण्यात येणार आहे.
हेही पाहा- विराट कोहलीला अश्रू अनावर, शुबमनच्या शतकानंतर बॉटलउडवली आणि मग…, तो फोटो Viral
पायलट प्रोजेक्ट म्हणून विक्री सुरू –
माहितीनुसार, सध्या हे फक्ट पायलट प्रोजेक्ट म्हणून केले जात आहे. इतर ठिकाणी त्याची अंमलबजावणी कशी करायची, याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही. शिवाय अशा प्रकारच्या दारू विक्री मशीन सुरू होतील की नाही, हे देखील प्रशासनाने सांगितलेले नाही. दारू खरेदीसाठी लावण्यात आलेल्या या वेंडिंग मशीनवरून सध्या राजकारण तापले आहे. वेंडिंग मशीनमुळे अल्पवयीन मुलांना दारू विकत घेणे सोपे होईल, असा दावा विरोधी पक्षांनी केला आहे. मात्र, मुलांनी त्यांचा वापर करू नये म्हणून व्हेंडिंग मशिनवर विक्रेते तैनात केले जातील असं राज्य प्रशासनाने सांगितलं आहे.
खाजगी कंपनीच्या मदतीने बसवले मशीन –
या मद्य वेंडिंग मशीनबाबत तामिळनाडूचे मंत्री बालाजी यांनी दावा केला आहे की, हे मशीन रात्री १० वाजेपर्यंत उघडे राहते आणि त्याची देखभाल करण्यासाठी एक कर्मचारी हजर असतो. शिवाय हे मशीन खाजगी क्षेत्रातील कंपनीने बसवल्याचेही त्यांनी सांगितले आहे.