चांगल्या पगाराची नोकरी मिळणे आपल्या सारख्यांसाठी तरी कविकल्पनाच. इथे काम करणाऱ्या कोट्यवधी लोकांना त्यांच्या मनासारखा पगार मिळतच नाही. आता स्पर्धाच एवढी आहे म्हटल्यावर जास्त पगार तरी कुठून मिळणार म्हणा? तेव्हा भारतीयांसाठी चांगल्या पगाराची नोकरी म्हणजे अनेकदा पूर्ण न होणारं स्वप्नच जणू. पण आपणही यातून उपाय शोधला आहे. आता इथे भरघोस पगाराची नोकरी मिळत नाही म्हटल्यावर अनेकजणांपुढे परदेशी जाण्याचा मार्ग असतोच. पण तुम्हाला माहितीये जगात फक्त काही मोजकी शहरं अशी आहेत जिथे तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी मिळू शकते. ही अशी शहरं आहेत जिथे कर्मचाऱ्यांना इतर शहरांच्या तुलनेत कैकपटीने जास्त पगार मिळतो.
‘डॉइचे’ बँकेने नुकतंच एक सर्व्हेक्षण समोर आणलं आहे. सर्वात जास्त पगार देणाऱ्या शहरांच्या यादीचा यामध्ये समावेश आहे. या सर्व्हेक्षणानुसार या यादीत स्विर्त्झलंडमधल्या झ्युरिक शहराचे नाव अव्वल स्थानावर आहे. या शहराबद्दल सांगायचं झालंच तर जगातील अनेक मोठ्या बँकांची मुख्यालयं या शहरात आहेत. मोठ मोठ्या कंपन्यांचीही मुख्यालयं झ्युरिकमध्ये आहे. तेव्हा या शहरातील कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक पगार मिळतो, असंही यात म्हटलं आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे ते सॅनफ्रॅन्सिस्को शहर आहे. तिसऱ्या क्रमांकार बोस्टन तर चौथ्या क्रमांकावर न्यूयॉर्क शहराचा समावेश आहे. त्यानंतर शिकागो, सिडनी, ओस्लो यासारख्या शहरांचा देखील या यादीमध्ये समावेश आहे. तेव्हा यापुढे कधी यासारख्या शहरातून नोकरीची संधी आलीच तर तुम्हाला भरघोस पगार मिळणार हे नक्की!