Viral Video: अनेक जण स्वावलंबी जीवन जगण्यासाठी अभ्यास आणि नोकरी एकत्र करतात, तर काही जण आर्थिक परिस्थितीमुळे कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी छोटं मोठं काम करून शिक्षण घेत असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे. इयत्ता सहावीत शिकणारा चिमुकला कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे फूटपाथवर हेअरबँड विकण्याचे काम करतो आहे, जे पाहून तुम्ही नक्कीच भावुक व्हाल.
पवन या दिल्लीत राहणाऱ्या चिमुकल्याने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिल्लीत कमला नगर मार्केटमधील मॅकडोनाल्ड्स बाहेर हा चिमुकला हेअरबँड विकतो आहे. पण, याचबरोबर तो मॅकडोनाल्ड्स बाहेरील फूटपाथवर बसून अभ्यासदेखील करताना दिसतो आहे. तर या गोष्टीकडे एका हॅरी या फोटोग्राफरचं लक्ष गेलं. त्याने पवनजवळ जाऊन त्याची विचारपूस केली. पवन आणि फोटोग्राफर हॅरी यांच्यात नेमका काय संवाद झाला एकदा तुम्हीसुद्धा पाहा.
हेही वाचा…हत्तीच्या कळपाची जंगलातील तलावात मजा-मस्ती; आयएएस अधिकाऱ्याने VIDEO शेअर करीत दिली ‘ही’ खास माहिती
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, फोटोग्राफर हॅरी विचारतो तेव्हा चिमुकला पवन सांगतो की, तो इयत्ता सहावीमध्ये शिकत आहे, पण कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी तो फूटपाथवर हेअरबँडही विकतो. तसेच कुटुंबाबद्दल विचारले असता पवनचे वडील कोलकातामध्ये असतात, तर आई घर सांभाळते; हे ऐकून फोटोग्राफर अशीच मेहनत कर आणि खूप अभ्यास कर व काही मदत लागली तर नक्की सांग असे आवर्जून सांगताना दिसतो आहे. नंतर फोटोग्राफर पवनला, मी तुझा फोटो काढला तर चालेल का? त्यावर चिमुकला हो म्हणतो आणि फोटोग्राफर त्याचे सुंदर फोटोसुद्धा काढतो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ireeliftforyou या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. फोटोग्राफर हॅरी याने चिमुकल्याची माहिती कॅप्शनमध्ये सांगितली आहे. जेणेकरून सर्व जण त्याला मदत करू शकतील. तर एका नेटकऱ्याने हा व्हिडीओ पाहिला आणि चिमुकल्याची मदत करण्यासाठी गेला. तेव्हा चिमुकला म्हणाला, मला शिक्षणासाठी वेगळी आर्थिक मदत करण्याची गरज नाही, पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हेअरबँड विकत घ्या. हे ऐकताच नेटकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. हा अनुभव नेटकऱ्याने व्हिडीओच्या कमेंटमध्ये शेअर केला आहे.