तुमचा सर्वात आवडता पदार्थ जर कुणी तुम्हाला खाऊ दिला नाही तर? कोणालाही राग येईलच नाही का. परंतु, हा रागावणारा आणि हट्ट करणारा जरा जास्तच गोड असेल तर? सध्या सोशल मीडियावर आपल्या आवडत्या पदार्थासाठी अशाच रुसून बसलेल्या एका लहान मुलाचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. ‘बर्गर’ दिला नाही म्हणून अस्वस्थ झालेल्या या मुलाची प्रतिक्रिया पाहून नेटिझन्सनी अनेक गंमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेमकं काय घडलंय? तर सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये फिकट निळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा घातलेला एक लहान मुलगा चिडून सांगतोय कि, “तुम्ही माझ्याशी बोलूच नका. मी उपाशीच राहीन. ठीके?” दरम्यान, या व्हिडिओमध्ये सुरु असलेल्या संभाषणातून स्पष्ट होत आहे कि, हा मुलगा अस्वस्थ झाला आहे. कारण त्याच्या बहिणीने फक्त स्वतःसाठी बर्गर ऑर्डर केला आणि त्याच्यासाठी नाही.” दरम्यान, “बर्गरसाठी इतका राग ठीक नाही” असं म्हणत ट्विटर यूझर मोहम्मद फ्यूचरवाला यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

बर्गरसाठी हट्ट करणाऱ्या लहानग्याचा व्हिडीओ ‘हा’ पाहाच!

हा व्हिडीओ शूट करणारी त्याची बहीण मात्र आपल्या भावाची गंमत करत त्याला चिडवत आणि हसत आहे. तर तिच्या अशा वागण्यामुळे अस्वस्थ झालेला तो लहानगा म्हणतो आहे कि, “तू तुझा बर्गर लवकर खाऊन घे. मी काही तो खाणार नाही.” त्यावर पुढे त्याला चिडवताना गंमतीने ती मुलगी (त्याची बहीण) म्हणतेय कि, “तुला बर्गर ऑर्डर करायचा होता तर तू बाबांकडून पैसे घ्यायला हवे होतेस. तुझ्याकडे पैसे नाहीत आणि तू म्हणतोस कि मला बर्गर हवा, हे बरोबर नाही.” त्यावर तर हा मुलगा जरा जास्तच वैतागलेला दिसून आला.

“मी उपाशीच राहीन. ठीके?”

पुढे ती मुलगी त्याला सारखी चिडवू लागली कि, “माझ्याकडे पैसे होते म्हणून मी माझ्यासाठी बर्गर ऑर्डर केला. पण तुझ्याकडे ऑर्डरसाठी पैसे नाहीत. असं कसं चालेल” त्यावर आणखी चिडून आणि वैतागून तो लहानगा म्हणाला कि, “तू माझ्यासाठी ऑर्डरच करूच नकोस. मला काहीही खायचं नाही. ठीके? मी उपाशीच राहीन.” आणि असं म्हणून चक्क तो रुसून तिथून लांब निघून जाताना दिसला आहे. त्यावर, त्याची ही गोड प्रतिक्रिया पाहून त्याला चिडवणारी त्याची बहीण हसू लागली. दरम्यान, या लहानग्याच्या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर देखील प्रतिक्रियांचा पाऊल पडताना पाहायला मिळाला.

कोणी गंमतीने म्हटलं कि, “तुम्ही या बाळाच्या धमकीला फार हलक्यात घेऊ नका”, तर कोणी म्हणाले कि, “बर्गर हे आयुष्य आहे, सगळे बर्गर आणून द्या रे ह्याला” इतकंच नव्हे तर काही जणांना थेट आपल्या बालपणाची आठवण झाली. त्यामुळे, या लहानग्याच्या बर्गरसाठीचा हा गोड हट्ट सोशल मीडियावर मात्र चर्चेचा विषय ठरला. काय मग तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून तुमच्या बालपणाची आठवण आली का?

Story img Loader