बहीण-भावाचं नातं हे खूप गोड आणि जिव्हाळ्याचं असतं. सतत एकमेकांसह भांडणारी भावंडं अडचणीच्या, संकटाच्या वेळी मात्र एकत्र असतात, एकमेकांची मजबूत ढाल बनून उभी राहतात. त्यामुळे नात्यात खूप आपुलकी आणि प्रेम असतं. काही झालं तरी आपल्या भावंडांना काही होऊ नये यासाठी ते प्रयत्न करतात. त्यात घरातील मोठी बहीण तर आईनंतर लहान भावंडांची पालनपोषण करणारी असते. वेळप्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांचा जीव वाचणारी दुसरी आई असते. अशाच तीन भावंडांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात एक मोठी बहीण रस्त्यावर खेळणाऱ्या आपल्या भावंडांना वाचवण्यासाठी थेट बुलडोझरसमोर उभी राहते. हा व्हिडीओ पाहून नक्कीच अनेकांना आपल्या मोठ्या बहिणीची आठवण येईल.
बहीण-भावाचे असे हे प्रेमळ नाते!
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी आपल्या भावाला आणि बहिणीला वाचवताना दिसत आहे. प्रत्यक्षात तिघेही रस्त्यावर उभे होते. यावेळी त्यांचे आई-वडील तिथे दिसले नाहीत. अशा स्थितीत रस्त्यावरून एक बुलडोझर येत होता; ज्यावर मोठ्या बहिणीची नजर पडते आणि ती कसलाही विचार न करता रस्त्याच्या मधोमध म्हणजे अगदी बुलडोझरच्या समोर जाऊन उभी राहते; जे पाहून बुलडोझर थांबतो. त्यानंतर मोठी बहीण रस्त्यावर खेळणाऱ्या आपल्या लहान भावंडांना घरात सुरक्षितरीत्या नेते. त्यानंतर दारात उभी राहून बुलडोझरकडे पाहत राहते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एवढ्या लहान मुलीकडे एवढा समजूतदारपणा कसा आहे, अशा स्वरूपाच्या कमेंट ते सोशल मीडियावर करीत आहेत.
हा व्हिडिओ ट्विटरवर द फिगेन नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली रस्त्यावर खेळणाऱ्या आपल्या भावाला आणि बहिणीला सुरक्षित घरात नेताना दिसत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर अनेक लाइक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिलेय की, एवढा समजूतदारपणा. तर दुसर्या युजरने लिहिले आहे की, मोठी बहीण असण्याची जबाबदारी. देव सर्वांचे रक्षण करो!