‘मुलांना काय कळतं, अजून ती लहान आहेत’, किंवा ‘त्यांना कळण्यासारखं नाही हे..’ असं अनेक आईबाबांच्या तोंडून ऐकू येतं. पण आजच्या पिढीतील लहान मुलं ही खूप हूशार होत आहेत, याचा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. आम्हाला इन्स्टाग्रामवर एका चिमुकल्या मुलीचा व्हिडीओ सापडलाय. या ३० सेकंदाच्या व्हिडीओमधून चिमुकलीने आयुष्य जगण्याचा धडा दिलाय. आपल्या बोबड्या चालीत या लहानश्या मुलीला आयुष्यचे धडे देताना पाहून सारेच जण चक्रावून गेले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधील चिमुकलीचं नाव अॅबी असं आहे. यापूर्वी अॅबी तिच्या मनमोहक व्हिडीओमुळे टिकटॉकवर चर्चेत आली होती. तिच्या निरागसतेने तिने लाखो लोकांची मन जिंकली होती. त्यानंतर आता तिच्या व्हिडीओचा बोलबाला इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा सुरू झालाय. इन्स्टाग्रामवर ‘alongcameabby’ नावाच्या अकाउंटवरून तिच्या व्हायरल व्हि़डीओंचा खजिना पहायला मिळतो. तिचं हे अकाउंटवर तिचे वडील सांभाळतात.
या व्हिडीओमध्ये आकर्षक फ्रॉक परिधान केलेली अॅबी तिच्या वेगवेगळ्या खेळण्यांसह खेळताना दिसून येतेय. खेळण्यात व्यस्त अॅबी तिच्या वडिलांना म्हणते, “फक्त कुणाचं अनुकरण करू नका…तुम्ही जे करत आहात तेच करत रहा. दुसऱ्याला तुमच्यापुढे जाऊ देऊ नका. फक्त लोक काय म्हणत आहेत याचा विचार करत बसण्यापेक्षा तुम्ही जे करत आहात तेच करा.” तिचा हा सल्ला ऐकून तिचे वडील सुद्धा तिचं कौतुक करताना दिसून येत आहेत. “खूप मोलाचा सल्ला…इतरांचा विचार करत बसू नका…तुम्ही केवळ तेच करा ते तुम्ही करत आला आहात.”
या चिमुकल्या अॅबीच्या तोंडून जगण्याचा हा सल्ला ऐकून सारेच जण तिचं कौतुक करताना दिसून येत आहेत. हा सल्ला देतानाचा व्हिडीओ शेअर करत तिच्या वडिलांनी कॅप्शनमध्ये “अॅबी मावशीकडून हा छोटासा सल्ला” असं लिहिलंय. बऱ्याचशा कठीण परिस्थितीत एकंदर परिस्थितीचं आकलन मुलांना होणं अवघड असतं हे अगदी खरंच. पण लहान मुलांचं विश्व या सगळ्या परिस्थितीपासून खूप दूरवर असतं. म्हणून त्याबाबत मुलांना काहीच न सांगणं किंवा काहीतरी गुळमुळीत अवास्तव सांगणं, ‘सगळं काही नेहमीसारखंच आहे’ असं भासवत राहणं, हा काही त्याच्यावरचा उपाय होत नाही. त्याऐवजी त्यांना परिस्थीतीबाबत वेळोवेळी शिकवणं हे पालकांचं कर्तव्य आहे, हे या व्हिडीओमधून दिसून आलं.
यश-अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. पण अपयश पदरी पडलं की प्रत्येकजण निराश होऊन हार मानतात. इतके प्रयत्न करूनही आपल्याच पदरी अपयश का असं म्हणत बहुतेक जण नशीबाला दोष देत राहतात. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चिमुकल्या मुलीचा व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला तुमचं अपयशावरही मात करण्याचं बळ मिळू लागेल. पुन्हा नव्याने आणि उमेदीने प्रयत्न करण्यास सुरूवात कराल.
अनेकांना अॅबीचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे. अॅबीचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण प्रोत्साहित झाले आहेत. तर काहींसाठी हा व्हिडीओ प्रेरणादायी ठरला आहे. अॅबीच्या वडिलांनी तीन दिवसांपूर्वीच हा व्हिडीओ शेअर केला होता. गेल्या तीन दिवसांत अॅबीच्या या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ७३ हजार लोकांनी पाहिलंय. तर साडे नऊ हजार पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. या व्हिडीओवर कमेंट्स सेक्शनमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत नेटिझन्स अॅबीच्या हूशारीचं कौतुक करताना दिसून येत आहेत.