सोशल मीडिया जसे मनोरंजनासाठी वापरले जाते; तसेच आता बरेचदा एखादी तक्रार थेट वरपर्यंत पोहोचवायची असल्यास त्यासाठीसुद्धा सोशल मीडियाचा वापर होत असतो आणि त्याने अनेकांना त्वरित मदतदेखील मिळते. अशीच घटना बेंगळुरूमध्ये घडल्याचे एक्स [ट्विटर]वर फिरणाऱ्या एका पोस्टवरून समजते. एका व्यक्तीने स्विगी या फूड डिलिव्हरी अॅपचा वापर करून, जवळच्या एका सामान्य हॉटेलमधून सॅलड मागवले होते. परंतु, त्या सॅलडमध्ये चक्क जिवंत गोगलगाय असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने ही गोष्ट ‘स्विगी’च्या निदर्शनास आणून देण्यासाठी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेमके हे प्रकरण काय आहे ते पाहा.
बेंगळुरूमधील धवल सिंह असे नाव असण्याऱ्या एका व्यक्तीने, स्विगी या फूड डिलिव्हरी अॅपच्या मदतीने, ‘लियॉन ग्रिल’ नावाच्या स्थानिक हॉटेलमधून सॅलड मागवले होते. सॅलडचा डबा उघडून बघताच त्याला त्यामध्ये एक जिवंत गोगलगाय हालचाल करताना दिसली. त्याने या सॅल़डचा एक व्हिडीओ एक्स [ट्विटर] या सोशल मीडियावरून शेअर केला आणि त्याला, “पुन्हा ‘लियॉन ग्रिल’मधून कधीही अन्न मागवणार नाही. @स्विगीकेयर्स कृपया याची दखल घेऊन, पुन्हा असा किळसवाणा प्रकार इतर कुणासोबतही होणार नाही, यासाठी काय करता येईल ते पाहावे. बेंगळुरूमध्ये राहणाऱ्यांनो कृपया याकडे लक्ष द्या,” अशी कॅप्शन दिलेली पाहायला मिळते.
हेही वाचा : ‘स्विगी’वरून मागवले दोन लीटर दूध; पण घरी आले २० लिटर!! सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे प्रकरण नेमके काय आहे? जाणून घ्या…
या पोस्टच्या कमेंट्समध्ये धवलने, त्याच्या “सॅलडमध्ये गोगलगाय तर सापडलीच; पण सोबत मी मागवलेले पेयदेखील चुकीचे पाठवले होते”, असेदेखील सांगितले. बरे या सगळ्यावर कळस म्हणजे जेव्हा त्याने ‘स्विगी’कडे याबद्दल तक्रार नोंदवली तेव्हा त्यांनी केवळ अर्धेच पैसे परत देणार, असे सांगितले. परंतु, या पोस्टनंतर धवलला संपूर्ण भरपाई मिळणार आहे.
ही पोस्ट एक्सवर शेअर होताच, ‘स्विगी’ने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली असून, धवलला त्याचा ऑर्डर आयडी देण्यासाठी सांगितल्याचे त्याच्या पोस्टवरून समजते. केवळ एक्स नव्हे, तर धवलने याबद्दल रेड्डीटच्या [Reddit] माध्यमातूनही “अतिशय गलिच्छ प्रकार. मी मागवलेल्या सॅलडमधील लेट्युसच्या पानांमध्ये जिवंत गोगलगाय होती. मला ती दिसली म्हणून नशीब. पुन्हा कधीही या हॉटेलमधून मागवणार नाही,” असे लिहीत याबद्दल तक्रार केल्याचे दिसते.
या एक्स पोस्टला आतापर्यंत १८ हजार व्ह्युज मिळाले असून, अर्थातच नेटकऱ्यांनी त्यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्सदेखील केल्या आहेत. त्यांचे या सर्व प्रकरणावर काय म्हणणे आहे पाहा.
“स्विगीने लवकरात लवकार या हॉटेलला ब्लॅक लिस्ट केले पाहिजे. मलादेखील या हॉटेलचा असाच अनुभव आला होता. मी मागवलेला पदार्थ शिळा किंवा खराब झालेला होता,” असे एकाने सांगितले. “माझ्यासोबतही याआधी असं झाल्यानं या घटनेबद्दल काहीच आश्चर्य वाटत नाही. स्वछतेच्या नावानं नुसती बोंब आहे तिथे,” अशी अतिरिक्त टिपण्णी दुसऱ्याने केली. “हे भयंकर आहे. आजकाल स्विगी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागले आहे. काही दिवसांपूर्वी माझी ऑर्डर एक डिलिव्हरी बॉय चोरून घेऊन गेला. स्विगीकडे तक्रार केल्यांनतर त्यांनीदेखील याची पडताळणी करून पुष्टी दिली. परंतु, माझा रिफंड येण्यासाठी मात्र २० दिवस वाट बघावी लागली आणि सतत त्यांच्याकडे विचारपूस करावी लागत होती,” असा स्वतःसोबत घडलेला किस्सा लिहिला आहे.