समुद्रसपाटीपासून तीन हजार पाचशे फूट उंच असलेल्या मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या एका गायीला तरुणांनी सुखरुप बाहेर काढले आहे. दोन दिवसांपासून ही गाय किल्ल्याच्या परिसरात असणाऱ्या दरीत अडकली होती. गायीला बाहेर काढण्यासाठी विसापूरवासियांनी खूप प्रयत्न केले, मात्र त्यांना यात यश आले नाही. त्यानंतर काही तरुणांनी हे आवाहन पेलत गायीला सुखरूप बाहेर काढले. हे सर्व तरुण लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र मंडळातील असून ते गिर्यारोहक आहेत.

विसापूर किल्ला परिसरात गायी चरायला येतात. या किल्ल्याला लागूनच लोहगड असून या दोन किल्ल्यांची टोक एकमेकांना जोडलेले आहेत. चाऱ्यासाठी गाय किल्ल्याभोवती फिरत फिरता लोहगडच्या दिशेने गेली. दरम्यान दोन्हीं किल्ल्यांच्यामध्ये असणाऱ्या पाचशे ते सहाशे फूट खोल दरीत ही गाय अडकली. विसापूर किल्ल्यातील सुरक्षा रक्षकाने गाय अडकल्याचे पाहिले. त्यानंतर विसापूर गावकऱ्यांनी गायीला काढण्याचा खूप प्रयत्न केला, परंतू त्यांना गायीला बाहेर काढण्यात अपयश आले. या मूक जनावराला कोठे जाता येत नव्हते. त्यात धो धो पाऊस देखील पडत होता. मग गावकऱ्यांनी लोणावळ्यामधील शिवदुर्ग मित्र टीमच्या गिर्यारोहकांना बोलावले. त्यांनी शक्कल लढवत या  दोरीच्या साहय्याने गायीला वर घेतले. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून या गायीला दरीतून वर काढण्याची धडपड सुरु झाली. तब्बल पाच तासानंतर तिला सुखरुप बाहेर काढण्यात आले. ही पाच तासांची कसरत  ३ तासांच्या हिंदी चित्रपटातील कथेतील चित्तथरारक क्षणाला साजेशी अशीच होती.

चारा आणि पाण्याशिवाय गायीची झालेली तळमळ तसेच खोल दरीत पडून तिच्या मृत्यूची भीत गावकऱ्यांना सतावत होती. मात्र गायीला  तरुणांनी जीवनदानच दिले आहे, असे म्हणावे लागेल. वैष्णवी भांगरे, प्रविण देशमुख ,किसन बोरकर, सुनिल गायकवाड, अजय मयेकर, रोहीत नगीने, मुन्ना शेख आणि डॉ.आशिष वनर या सर्वांनी प्रयत्नांची पराकष्ठा करत मुक्या जनावराला वाचवून गोसंवर्धनाचा खरा संदेश दिला आहे.

Story img Loader