देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सामाजिक संस्था आणि सेलिब्रिटींकडूनही जनजागृती केली जात आहे. पण काही सर्वसामान्यसुद्धा त्यांच्या वागण्यातून समाजापुढे उत्तम उदाहरण सादर करतात. उधमपूरच्या एका नवविवाहित दाम्पत्याने हीच गोष्ट सिद्ध केली. गुरुवारी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं. याच दिवशी विवाहबद्ध झालेल्या जम्मू-काश्मीरमधील उधमपूरच्या एका दाम्पत्याने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी लग्नानंतर थेट मतदानकेंद्र गाठलं.

लग्नाच्याच पोशाखात हे दाम्पत्य मतदानकेंद्रावर पोहोचलं. आयुष्याच्या महत्त्वपूर्ण दिवशी त्यांनी वेळ काढून मतदान करत त्यांनी चांगला आदर्श समाजापुढे ठेवला आहे. सोशल मीडियावर या दाम्पत्याचे फोटो व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे.

https://twitter.com/upjit_jeety/status/1118790126887419904

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील ९५ जागांसाठी मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील या ९५ जागांसाठी १६,०० उमेदवार रिंगणात आहेत. जम्मू-काश्मीरमधील दोन, मणिपूरमधील एक, पुद्दुचेरीमधील एक, तामिळनाडूतील ३८, कर्नाटकातील १४, महाराष्ट्रातील १०, उत्तर प्रदेशमधील आठ, आसाममधील पाच, बिहारमधील पाच, ओडीशामधील पाच, छत्तीसगडमधील तीन आणि पश्चिम बंगालमधील तीन जागांसाठी मतदान पार पडले.