लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल आज जाहीर झाले. ५४२ जागांसाठी मतमोजणी पार पडली. लोकसभा निवडणूक निकालातील आतापर्यंतचे कल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. उत्तरप्रदेशच्या निकालाने अनेकांना चकीत केलं आहे. काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा यांनी अमेठीच्या जागेवर स्मृती इराणी यांचा पराभव करून संपूर्ण देशाला चकित केले. स्मृती यांचा पराभव राहुल यांच्या मागील पराभवापेक्षा मोठा आहे. जवळपास लाखोंच्या मतांनी स्मृती ईराणी यांचं हे आव्हान शमलं आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्मृती इराणी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा अमेठी मतदरासंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१९ मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव केला होता. अमेठी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख शहर आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. उत्तर प्रदेशमधील ८० मतदारसंघांपैकी अमेठी आणि रायबरेलीतील निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे विशेष लक्ष होते. हे दोन्ही मतदारसंघ गांधी-नेहरु घराण्याचे पारंपारिक मतदारसंघ मानले जातात. अमेठीमधून यावेळी काँग्रेस नेते किशोरी लाल शर्मा यांना भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्याविरोधात उभे करण्यात आले होते. दरम्यान काँग्रेसच्या किशोरी लाल शर्मा यांनी प्रचंड मताधिक्याने हा विजय मिळवला आहे. आता स्मृती इराणी यांच्या पराभवानंतर सोशल मिडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. पराभवामुळे त्यांना सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे.

सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल

दरम्यान, २०१९ मध्ये राहुल गांधींना पराभूत करणाऱ्या स्मृतींना दुसऱ्यांदा अमेठीच्या जनतेने संधी दिली नाही. या पराभवाबद्दल इराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपाचे सर्व कार्यकर्ते आणि समर्थक, ज्यांनी निष्ठेने मतदारसंघासाठी काम केलं आणि पक्षाची सेवा केली आहे, त्यांचे मी आभार मानते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आभारी आहे की त्यांच्या सरकारने ३० वर्षांची प्रलंबित कामं फक्त पाच वर्षात पूर्ण केली. जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करते, मी अमेठीच्या जनतेची सेवा करत राहीन,” असं स्मृती इराणी पराभूत झाल्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha results 2024 smriti irani accepts defeat in amethi netizens share viral funny memes pdb