Lok Sabha Election 2024 Phase 3 puneri video: देशात यंदा लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी १९ एप्रिलला पहिला टप्पा आणि २६ एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला आहे. आज (मंगळवार, ७ मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळपासून अनेक मतदान केंद्रांवर रांगा पहायला मिळत आहे. अशातच पुण्यामधील एका आजोबांचा मतदान केंद्रावरील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच डोक्याला हात लावाल.
हा व्हायरल होणारा व्हिडीओ पुण्यातील धायरीतील आहे. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदानादरम्यानचा प्रकार घडला आहे. यावेळी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आलेले आजोबा ‘EVM वर कमळाचं चिन्हच दिसत नाही’ म्हणत संतापले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती आजोबांना काय झालं अशी विचारणा करत आहे. यावेळी ते आजोबा ‘EVM मशीनवर कमळाचं म्हणजेच भाजपचं चिन्हच नाही अशी तक्रार करत आहेत. “कमळ हे चिन्हच नाही. उमेदवार नाही तर आम्ही त्याला काय करणार. कमळाचं चिन्ह नाही तर आम्ही कसं मतदान करणार. मतदान करायचे आहे पण कमळ फुल कुठे आहे?, असा सवाल आजोबांनी केला आहे. “असं कुठे असतं का असं कसं कमळाचं चिन्ह नाही” म्हणत आजोबा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीवरच भडकले आहेत.
मात्र बारामती लोकसभा मतदार संघात महायुती कडून सुनेत्रा पवार ‘घड्याळ’ तर मविआ कडून सुप्रिया सुळे ‘तुतारी फुंकणार्या माणसाच्या’ चिन्हावर निवडणूकीच्या मैदानात उतरल्या आहेत. भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात यंदा भाजपाचा उमेदवार नसल्याने आजोबांनी राग व्यक्त केल्याचा हा एक प्रकार मतदान केंद्रातून समोर आला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
हा व्हिडीओ @gajanan_ra55704 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला भरपूर व्ह्यूज मिळत आहेत. नेटकरीही व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. “अरे नाही भाऊ, महाराष्ट्रात लोक मतदान केंद्रावरून परतत आहेत, मतदान यंत्रात कमळाचे फूल दिसत नाही.” असं कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे.
राज्यासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सुरुवातीच्या दोन तासात ५.७७ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत या मतदारसंघात १४.६४ टक्के मतदान झाले. आतापर्यंत सर्वाधिक १८.६३ टक्के मतदान बारामती विधानसभा मतदारसंघात झाले आहे. त्या खालोखाल इंदापूर विधानसभा मतदारसंघात १४.६८ टक्के मतदान झाले आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात १४.८ टक्के, खडकवासला विधानसभा मतदारसंघात १४ टक्के, भोर १३.८ टक्के, तर दौंडमध्ये १२ टक्के मतदान झाले आहे.