Lok Sabha Election 2024 Phase 2 : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड शुक्रवारी बेंगळुरू येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचला. मतदानाची संधी मिळण्यापूर्वी राहुल द्रविड सामान्य माणसाप्रमाणे अगदी रांगेत उभा राहिला. मतदान केल्यानंतर राहुल द्रविडने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि प्रत्येकाने मतदान करावे, असे सांगितले. ही संधी लोकशाहीतच मिळते. द्रविडचा माजी सहकारी आणि महान भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळेनेही बेंगळुरूमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यानंतर सोशल मीडियावर राहुल द्रविडच्या साधेपणाचे युजर्स कौतुक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल द्रविड अगदी साधे टीशर्ट आणि हाफ पँट घालून मतदान केंद्रावर पोहोचला. यावेळी रांगेत उभं राहून तो आपली टर्न येण्याची वाट पाहत होता. त्याचा हा साधेपणा तिथे उपस्थित लोकांनाही भावला. अनेकांनी व्हिडीओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये त्याच्या या साधेपणाचे तोंडभरून कौतुक केले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी कर्नाटकातील १४ जागांसाठी मतदान होत आहे.

५४३ सदस्यांच्या संसदेत २८ जागा असलेल्या कर्नाटकात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. आज १४ जागांसाठी मतदान होत आहे, ज्यामध्ये उडुपी चिकमंगळूर, हसन, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, तुमकूर, मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, बेंगळुरू ग्रामीण, बेंगळुरू उत्तर, बेंगळुरू मध्य, बेंगळुरू दक्षिण, चिकबल्लापूर आणि कोलार या जागांचा समावेश आहे.

यंदा लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होत आहेत. पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी झाला, ज्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यात मतदानाची टक्केवारी ६२ टक्क्यांहून अधिक झाली होती. यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतेय, यानंतर तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksabha elections 2024 live indian cricket team coach rahul dravid down to earth while bengaluru loksabha elections polling wins internet sjr