संसदेने ४ एप्रिल २०२५ रोजी वक्फ (सुधारणा) विधेयक मंजूर केले; पण देशभरात वक्फ विधेयकाविरोधात हिंसक आंदोलने होत आहेत. त्यात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. या हिंसाचाराच्या घटनांदरम्यान लोकसभा सदस्य व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये त्या वक्फ विधेयकाविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण, प्रियांका गांधी खरोखरच वक्फ विधेयकाविरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या का याविषयीचे सत्य जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर अंजुम निशा यांनी त्यांच्या प्रोफाइलवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला.
इतर युजर्सदेखील अशाच दाव्यासह व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड केला आणि त्यानंतर व्हिडीओच्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून व्हिडीओचा तपास सुरू केला.
आम्हाला काँग्रेस केरळच्या एक्स प्रोफाइलवर पोस्ट केलेला असाच एक व्हिडीओ आढळला. हा व्हिडीओ ५ ऑगस्ट २०२२ रोजी शेअर करण्यात आला होता.
आम्हाला ‘द वीक’च्या वेबसाइटवर यासंबंधीची एक बातमी आढळली.
ही बातमी ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रकाशित झाली होती. त्यात म्हटले आहे : महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढ व बेरोजगारी यांच्याविरोधात पक्षाच्या देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी शुक्रवारी एआयसीसी मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
आम्हाला अनेक मीडिया चॅनल्सच्या यूट्यूब चॅनेलवरदेखील या घटनेचे शेअर केलेले व्हिडीओ आढळून आले.
निष्कर्ष :
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी-वाड्रा यांचा २०२२ या वर्षामधील महागाईविरोधातील आंदोलनाचा व्हिडीओ आता अलीकडील वक्फ विधेयकाच्या विरोधातील आंदोलनाचा असल्याचा खोटा दावा करीत शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल झालेला दावा दिशाभूल करणारा आहे.