आताचे जग हे वेगवान झाले आहे. वेगाची ही नशा कधीकधी इतकी जास्त होते की जीवनातील वेगामुळे आपली माणसेदेखील मागे पडतात. माणूस जगाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात साधत असताना आसपास असणाऱ्या माणसांकडे मात्र दुर्लक्ष करतो. या सगळ्याचा परिणाम नातेसंबंध, कुटुंब व्यवस्था आणि विवाह संबंधांवर होतो आहे. मात्र जगातील एका दाम्पत्याने ९० वर्ष त्यांचे नाते टिकवले. अखेर सर्वाधिक काळ सहजीवन जगणाऱ्या या दाम्पत्याला मृत्यूच वेगळा करु शकला.
इंग्लंडमध्ये राहणाऱ्या करमचंद यांनी ११० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारतीय वंशाच्या करमचंद यांचा जन्म १९०५ मध्ये पंजाबमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. १९२५ साली करमचंद यांचा विवाह करतारी यांच्याशी संपन्न झाला. हे दाम्पत्य त्यांच्या मुलासह १९६५ मध्ये इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. गेली ५१ वर्ष करमचंद आणि करतारी त्यांचा मुलगा पॉलसह ब्रॅडफॉर्डमध्ये राहात होते.
करमचंद आणि करतारी यांचा स्वभाव अतिशय साधा होता. या दोघांमध्ये कधीच वाद व्हायचा नाही. त्यामुळेच या दाम्पत्याला शेजारी राहणारे लोक सेलिब्रिटींसारखे प्रेम करायचे. मध्यंतरी या दाम्पत्याच्या हस्ते ब्रॉडवे शॉपिंग सेंटरचे उद्घाटनदेखील करण्यात आले होते. करमचंद आणि करतारी यांना ८ मुले आणि २७ नातवंडे आहेत.
‘आवडता आणि संतुलित आहार यामुळेच आपण शंभरी पार करु शकलो’, असे करमचंद यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत म्हटले होते. करमचंद आणि करतारी यांचे सहजीवन ९० वर्ष २९१ दिवस टिकून होते. नातेसंबंधातील गोडवा कमी होत असलेल्या, घटस्फोटांचे प्रमाण वाढलेल्या आजच्या काळातील सगळ्यांनाच करमचंद आणि करतारी यांचे सहजीवन बरेच काही सांगून जाणारे आहे.