उत्साहाला उधाण आणणाऱ्या गणेशोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे आणि याच निमित्ताने सर्वत्र अगदी आनंदी वातावरण आहे. गणेशोत्सवादरम्यान गणेशभक्त विविध गोष्टी करून आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच अनेक कलाकारसुद्धा रांगोळी, चित्र, पोट्रेट यांच्याद्वारे गणपती बाप्पासाठी काहीतरी खास करून दाखवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. तुम्ही आतापर्यंत कागदी नोटा, नाण्यांपासून तयार करण्यात आलेले गणपती पाहिले असतील, पण तुम्ही कधी स्टीलच्या वाट्यांपासून साकारलेला गणपती पहिला आहे का? तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. चक्क एक हजार स्टीलच्या वाट्यांपासून गणपती साकारण्यात आला आहे; जे पाहून तुम्ही हा व्हिडीओ एकटक बघत राहाल.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने समुद्राच्या वाळूत एक गणपती साकारण्यात आला आहे. गणपतीचे मुख आणि त्याचे वाहन उंदीर यांचे चित्र वाळूत रेखाटले आहे आणि त्यांची सजावट जवळपास एक हजार स्टीलच्या वाट्यांपासून केली आहे. गणपती बाप्पाचे मुख, सोंड, कान, मस्तक, मुकुट आणि त्यांचे वाहन उंदीरसुद्धा स्टीलच्या वाट्यांपासून सजवण्यात आले आहे, जे बघायला अगदीच सुंदर आहे. सगळ्यात पहिला गणपती आणि वाहन उंदीर यांचे चित्र वाळूत रेखाटून त्यावर छोट्या छोट्या स्टीलच्या वाट्या बसवण्यात आल्या आहेत. एक हजार स्टीलच्या वाट्यांपासून साकारण्यात आलेला गणपती एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाचं…
व्हिडीओ नक्की बघा :
एक हजार स्टीलच्या वाट्यांपासून साकारला गणपती :
अनोखा गणपती साकारणाऱ्या कलाकाराचे नाव : ‘प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक’ असे आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना २०१४ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. सुदर्शन पटनायक मुळचे ओडिशा राज्यातील आहेत. तसेच ते ओडिशाच्या पुरी बीचवर प्रत्येक सणांदरम्यान आणि विविध विषयांवर वाळूपासून अनेक कलाकृती बनवतात आणि अनेकांची मने जिंकत असतात; तर गणेशोत्सवादरम्यान त्यांनी गणपती आणि त्याचे वाहन उंदीर यांचे चित्र ओडिशाच्या पुरी बीचवर वाळूत साकारले आहे.
एक हजार स्टीलच्या वाट्यांपासून तयार केलेल्या गणपतीची खास झलक @sudarsansand यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहे आणि जय गणेश, जय गणेश ! ‘गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ओडिशातील पुरी बीचवर सुमारे एक हजार स्टीलच्या वाट्या बसवून वाळू कला सादर केली ‘ असे कॅप्शन देण्यात आले आहे. अनेक जण वाळूत कला सादर केलेली पाहून ‘गणपती बाप्पा मोरया’ असे कमेंटमध्ये बोलताना दिसून आले आहेत.