येत्या २२ तारखेला राम मदिरांचा उद्धाटन सोहळा पार पाडणार आहे. यावेळी प्रभू रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त देशभरात उत्सव साजरा केला जात आहे. राम मंदिराचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजर्स प्रभू रामाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. अशातच ५०० रुपयांच्या नोटेवर गांधीजी ऐवजी श्रीरामाचा फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल नोटेमागील सत्य काय आहे? खरंच आरबीआयने ही नोट बाजारात आणली आहे का? आज आपण या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
काय होत आहे व्हायरल?
सोशल मीडियावर ५०० रुपयांच्या नोटेचा एक फोटो व्हायरल होत आहे. या नोटेवर गांधीजी ऐवजी श्रीरामाचा फोटो दिसत आहे. नोटेच्या दुसऱ्या बाजूला धनुष्यबाणाचे चित्र आणि राम मंदिराचा फोटो दिसत आहे. हा फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
गेल्या काही दिवसांपासून २२ तारखेला होऊ घातलेल्या राम मंदिराच्या उद्धाटनानिमित्त नवीन नोट जारी होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. आता हा फोटो समोर आल्याने एकच चर्चा रंगली आहे.
याशिवाय सर्वात जास्त वापरले जाणारे व्हॉट्सअप या मेसेजिंग अॅपवर सुद्धा श्रीरामाचा फोटो असलेल्या या ५०० रुपयांच्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे. याशिवाय ही नवी नोट आरबीआयकडून छापली असल्याचा दावा केला जात आहे.
तपास :
श्रीरामाचा फोटो असलेला ५०० रुपयांची नोट खरंच बाजारात आली आहे का? असा प्रश्न अनेक जण विचारत आहे. आम्ही या संदर्भात तपास केला आणि सखोल माहिती घेतली तेव्हा कळले की ही बनावट नोट आहे. अशी कोणतीही नोट बाजारात आलेली नाही आणि आरबीआयने छापलेली नाही. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर या नोटेसंदर्भात कोणतीही माहिती आढळली नाही याशिवाय आरबीयने सुद्धा या नोटेसंदर्भात कोणतीही पुष्टी केलेली नाही.
निष्कर्ष: हा व्हायरल होत असलेला फोटो एडिट केलेला आहे. ५०० रुपयांच्या नोटेबरोबर छेडछाड केलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा बनावट नोटांपासून सावध राहावे आणि कोणत्याही फसवणूकीला बळी पडू नये.