‘मिकी माऊस’ हे चिमुकल्यांचं आवडतं कार्टुन कॅरेक्टर. किमान तीन ते चार पिढ्या याच मिकी माऊसला पाहून लहानाच्या मोठ्या झाल्या. या सर्वांच्या लाडक्या मिकीचा ९० वा वाढदिवस नुकताच पार पडला. पण मिकी माऊस हे मूळ पात्र ज्या कार्टुन कॅरेक्टरपासून प्रेरित होतं ते कार्टुन कॅरेक्टर काळाच्या ओघात विस्मरणात गेलं. हे कार्टुन कॅरेक्टर म्हणजेच ‘ओस्वॉल्ड : द लकी रॅबिट’ होय. दिसायला हुबेहुब मिकीसारख्या दिसणाऱ्या या सश्याच्या शोधात सर्वजण होतं. कारण या ससुल्यावर आधारित शॉर्टफिल्म १९२८ मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. ही शॉर्टफिल्म कोणाकडेही उपलब्ध नव्हती, म्हणूनच तिचा शोध वॉल्ट डिझ्ने घेत होती. अखेर ९० वर्षांनंतर या चित्रपटाची एकमेव कॉपी जपानमध्ये सापडली आहे.
ओस्वॉल्ड आणि मिकी हे दोघंही दिसायला सारखेच दिसायचे. मात्र ओस्वॉल्ड ससा असल्यानं मिकीच्या तुलनेत त्याचे काम लांब ठेवण्यात आले होते. वॉल्ड डिझ्ने यांनी सुरूवातीला ओस्वॉल्ड हे कार्टुन कॅरेक्टर तयार केलं होतं. मात्र व्यावसायिक भागीदारासोबत खटके उडाल्यानंतर वॉल्ट यांनी ओस्वॉल्ड या कार्टुन कॅरेक्टरवर असलेले आपले सारे हक्क गमावले. पुढे जाऊन वॉल्ट यांनी ओस्वॉर्डपासून प्रेरणा घेत मिकी माऊसची निर्मिती केली.
“Neck ’n’ Neck,” नावानं ओस्वॉल्डवरच आधारित शॉर्टफिल्म १९२८ मध्ये प्रकाशित झाली होती. ही शॉर्टफिल्म नंतर कुठेही उपलब्ध नव्हती. तिचा शोध बऱ्याच वर्षांपासून सुरू होता. तब्बल ९० वर्षांच्या शोधानंतर अखेर या शॉर्टफिल्मची चित्रफित ८४ वर्षांच्या एका जपानी व्यक्तीकडे सापडली . शाळेत असताना त्यांनी ५०० येन म्हणजे ३०० रुपये मोजून ही चित्रफित विकत घेतली होती. अगदी कालपर्यंत या चित्रफितीचे मुल्य हे सर्वाधिक असल्याचं त्यांना अजिबातच ठावूक नव्हतं. वॉल्ड डिझ्ने यांनी ओल्वॉडवर आधारित २६ हून अधिक शॉर्टफिल्मची निर्मिती केली होती. त्यातल्या अनेक चित्रपटांच्या चित्रफिती उपलब्ध नाही. मात्र ज्या चित्रफितीचा शोध गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू होता ती अखेर जपानमध्ये सापडली असल्यानं सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला आहे.