आजकाल लोक रील्स व्हिडिओ शुट करण्याच्या नादात इतके हरवून जातात की आपण कुठे आहोत, काय करत आहोत याचे देखील भान राहत नाही. कधी कोणी भररस्त्यात वाहनांची ये-जा सुरु असताना डान्स करताना रील शुट करताना दिसतात तर कोणी तर कधी ट्रेनमध्ये स्टंटबाजी करतात तर कधी नदी-किनारी किंवा समुद्र किनारी जाऊन रीट शुट करतात. अनेकदा लोक रीलच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. सोशल मीडियावर एक हृदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये व्हिडिओ शूट करताना काही सेकंदातच एक महिला गंगा नदीत बुडते आणि वाहून जाते. दरम्यान तिथे उभी असलेली तिची मुलगी मम्मी-मम्मी’ असे ओरडत आहे. चिमुकलीची ती हाक ऐकून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.

ही महिला तिच्या कुटुंबासह उत्तरकाशीला भेट देण्यासाठी आली होती

ही घटना उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील मणिकर्णिका घाट येथे घडली. आपल्या कुटुंबासह येथे भेट देण्यासाठी आलेल्या एका नेपाळी महिलेचा भागीरथी नदीत रील बनवताना वाहून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडल्याचे सांगितले जात आहे. रीलच्या नादात महिलेने तिचे जीव गमावला.

व्हिडीओमध्ये नदीच्या किनाऱ्यावर एक महिला रील बनवताना दिसते. थंड पाणी असलेल्या नदीचा प्रवाह वेगात वाहताना दिसत आहे. ती महिला कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाय योजनांशिवाय नदीत उतरली आणि रील बनवू लागली. त्यावेळी अचानक महिलेचा पाय घसरला आणि ती नदीच्या पाण्यात पडते. ती बाहेर येण्यासाठी धडपडते पण प्रवाहात इतका जोरात आहे की ती वाहून जाते. आईला पाण्यात पडलेले पाहून चिमुकली जीवाच्या आकांताने मम्मी मम्मी असे ओरडते.

रील बनवणे ठरले धोकादायक

व्हिडिओमध्ये असे दिसून येते की अपघाताबाबत तिथे उपस्थित असलेल्या लोकांना काहीही समजले नाही. चिमुकली घाटावर उभी राहून आपल्या आईला हाक मारत होती पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. माहिती मिळताच प्रशासनाने कारवाई केली आणि एसडीआरएफ आणि स्थानिक पोलि‍सांची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली. पण, बचाव पथकाने बरीच शोध घेतल्यानंतरही ती महिला सापडली नाही.

ही घटना पुन्हा एकदा आपल्याला विचार करण्यास भाग पाडते की, सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूजच्या नादात लोकांनी जीव धोक्यात टाकू नये.

प्रशासनाने इशारा दिला

प्रशासनाने इशारा दिला आहे की पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी नदीकाठच्या धोकादायक भागात अत्यंत सावधगिरी बाळगावी. सोशल मीडियासाठी कंटेंट तयार करताना सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. उत्तरकाशी प्रशासन आणि स्थानिक पोलिस महिलेला शोधण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.