कोणत्याही मंदिराची दानपेटी म्हटल्यावर त्यामध्ये भाविक दक्षिणा टाकतात. ही दक्षिणा जमा करण्यासाठी मंदिराचे पुजारी किंवा ट्रस्टी ही पेटी उघडतात आणि ही दक्षिणा काढून घेतात. आता यामध्ये नवीन काहीच नाही. पण कर्नाटकातील हासनाम्बा मंदिरातील पुजाऱ्यांना दानपेटीत चक्क एक प्रेमपत्र सापडले आहे. इतकेच नाही तर दानपेटीतील हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहे. आता या पत्रात असे काय आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

तर यामध्ये पत्र लिहिणाऱ्याने देवीला आपल्याला आपले प्रेम मिळावे यासाठी साकडं घातलं आहे. या प्रेमपत्राबरोबरच देवीच्या दानपेटीत इतरही काही पत्रे मिळाली आहेत. मात्र हे प्रेमपत्र खूप व्हायरल झाले आहे. हासनाम्बा मंदिर भाविकांसाठी वर्षातून केवळ एकदा दर्शनासाठी उघडले जाते. भगवती देवीच्या दर्शनासाठी देशभरातील नागरिक याठिकाणी येतात. यावर्षी हे मंदिर १२ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या काळात सुरु होते. ९ दिवस पूर्ण झाल्यानंतर या मंदिराची दानपेटी उघडण्यात आली. तेव्हा त्यात भाविकांनी आपल्या इच्छा लिहिलेल्या चिठ्ठ्या सापडल्या. परंतु, प्रेमपत्राची मोठी चर्चा सुरु आहे. यामधील मुलाने मी एका मुलीवर मनापासून प्रेम करतो. मी तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तिचे आई-वडील आमच्या लग्नासाठी तयार नाहीत. मला या परिस्थितीशी लढण्याची शक्ती द्यावी.

याबरोबरच आणखी एका पत्रात एका महिलेने आपल्याला सासरी अनेक गोष्टींचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले आहे. तर एका युवकाने आपल्याला लवकर नोकरी मिळावी अशी मनोकामना केली आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीने आपली जमिनीच्या समस्येतून सुटका व्हावी अशी मनोकामना व्यक्त केली आहे. यावेळी एकूण १६ दानपेट्या उघडण्यात आल्या. त्यातून एकूण ४ कोटी १४ लाख रुपये मिळाल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

Story img Loader