LPG Cylinder Scam Video: आपल्या घरात स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. भारतात आजही लाखो घरांमध्ये गॅस सिलिंडर हाच मुख्य ऊर्जा स्रोत आहे. आपल्या रोजच्या सगळ्यात महत्त्वाच्या गरजांमधली एक गरज म्हणजे एलपीजी (LPG) सिलिंडर. खरं तर, बहुतेक लोक घरात १४.२ किलो एलपीजी सिलिंडर (LPG Cylinder) वापरतात. पण सिलिंडर घेताना तुमची अनेक वेळा फसणूक होत असल्याचं समोर आलं आहे. बरेच लोक चांगले स्वच्छ सिलिंडर विकत घेतात. परंतु, एलपीजी सिलिंडर वापरताना ग्राहकांनी बरीच सावधगिरी बाळगली पाहिजे.
एलपीजी सिलिंडरमध्ये गॅसच्या कमतरतेच्या तक्रारी आजपासून नाही तर बऱ्याच काळापासून येत आहेत. यापूर्वीही अनेक जागरूक ग्राहकांनी त्यांच्या घरी येणारा सिलिंडर मानक वजनापेक्षा कमी असल्याचे उघड केले आहे. या घोटाळ्याबाबत आता दिल्लीतील रोहिणी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने या गॅस घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. सिलिंडर देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला त्यांनी कॅमेऱ्यात कैद केले आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. नेमका हा घोटाळा कसा उघड झाला ते जाणून घेऊ…
दिल्लीतील रोहिणी येथे राहणाऱ्या एका ग्राहकाने सिलिंडरची डिलिव्हरी करायला आलेल्या कर्मचाऱ्याला चांगलाच धडा शिकवला. या व्हिडीओमध्ये ग्राहक सांगतो की, पूर्वी त्याचा सिलिंडर २० दिवस चालायचा. पण जेव्हापासून एका व्यक्तीने त्याला योग्य डिलिव्हरी देण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्याचा सिलिंडर एक महिन्यापेक्षा जास्त काळ टिकू लागला. सुरुवातीला मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण सिलिंडर डिलिव्हरी करणाऱ्या माणसानेच मला या घोटाळ्याबद्दल माहिती दिल्याचे ग्राहकाने सांगितले.
ग्राहकाने सिलिंडरचे वजन केल्यावर सत्य त्याच्यासमोर आले. सिलिंडरचे वजन आधी कमी असायचे आणि आता ते थोडे जास्त असल्याचे उघड झाले. यावरून ग्राहकाला गॅसची चोरी होत असल्याचे ध्यानात आले. डिलिव्हरी बॉय जेव्हा सिलिंडरची डिलिव्हरी करायला आला तेव्हा ग्राहकाने थेट त्याला फटकारले आणि त्याला जाब विचारला. तेव्हा डिलिव्हरी बॉय असलेल्या व्यक्तीने सिलिंडर गॅसची चोरी करीत असल्याचे स्पष्टच सांगितले. हा तीन मिनिटांचा व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही संताप व्यक्त केला आहे.
येथे पाहा व्हिडीओ
X वर हा व्हिडीओ पोस्ट करताना @gharkekalesh ने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘रोहिणीमध्ये सिलिंडर घोटाळा’. आतापर्यंत या व्हिडीओला ७५ हजारांहून अधिक व्ह्युज आणि एक हजाराहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तर, पोस्टवर ३० हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले, “हे या लोकांचे अतिरिक्त कमिशन आहे, ज्यामध्ये ते प्रथम सिलिंडर घरी पोहोचवण्यासाठी पैसे मागतात आणि नंतर कमी गॅस देऊन त्यातूनही पैसे कमवतात.”