प्रत्येक व्यक्तीमध्ये लहानपणापासूनच काही खास गुण, कला दडलेल्या असतात. या कला काही छंद म्हणून जोपासतात, काही त्यातूनच आपले आयुष्य घडवतात; तर काहींना आपल्यात कोणते कलागुण दडले आहेत हे माहीतच नसते. गाणे, नाचणे, चित्रकला, अभिनय, संगीत, खेळ अशा कितीतरी गोष्टींची यादी आपण तयार करू शकतो. अनेकांना बसल्याबसल्या कंटाळा आल्यावर किंवा काही सूचत नसल्यास शिट्टी वाजवायची सवय असते. खरंतर शिट्टी वाजवणे हीदेखील एक प्रकारची कला असून, प्रत्येकाला जमतेच असे नाही. एखाद्या गाण्याच्या चालीवर ओठांचा चंबू करून नकळत शिट्टी वाजवली जाते. मात्र, अशीच शिट्टी वाजवून एका मुलीने गिनीज बुकात आपल्या नावाची नोंद केली आहे.

लुलु लोटस असे या मुलीचे नाव आहे. ती चक्क आपल्या नाकाने शिट्टी वाजवते. इतकेच नव्हे, तर गिनीज बुकमध्ये ‘नाकाने सर्वात मोठ्याने वाजवली जाणारी शिट्टी’ म्हणून तिची नोंद झाली आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम सोशल मीडियावरील @guinnessworldrecords या अधिकृत पेजवरून या भन्नाट कलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती वाजवत असलेली शिट्टी तिचा पाळीव कुत्रादेखील अत्यंत लक्ष देऊन ऐकत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

हेही वाचा : भारतीयांचे पाच भन्नाट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड; पत्त्यांच्या बंगल्यापासून ते मेट्रो प्रवास, विक्रमांची यादी पाहा….

आपल्याकडे अशी भन्नाट कला आहे याची जाणीव लुलुला कधी झाली?

शाळेमध्ये असताना तिला तिच्याकडे अशी कला आहे याची जाणीव झाली. इतकेच नव्हे, तर आपल्याला तोंड न उघडता नाकाने शिट्टी वाजवून वेगवेगळी गाणी, चाली वाजवता येत असल्याने अनेकदा शिक्षकांसमोर, वर्गात भरपूर खोड्यादेखील काढल्या आहेत, अशी माहिती लुलुने गिनीज बुकला देताना सांगितली.
“केवळ माझे गिनीज बुकात नाव नोंदवले गेले याबद्दल मी हा आनंद व्यक्त करत नसून, आतापर्यंत मला माझ्या मित्रांनी दिलेली साथ, अनोळखी व्यक्तींनी केलेले कौतुक आणि आपल्याही नावावर एखादा विक्रम असावा असे माझे स्वप्न, या सगळ्यांना खूप धन्यवाद देते”, असे लुलु म्हणते.

लुलु नाकातून आवाज बाहेर काढण्यासाठी आपल्या घशातील स्नायूंवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे तोंडातून येणारा आवाज नाकातून बाहेर येतो, असे गिनीज बुकने सांगितले असल्याची माहिती हिंदुस्थान टाइम्सच्या एका लेखातून समजते.

हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर अशी आगळीवेगळी आणि भन्नाट कला पाहून नेटकऱ्यांनी त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : गेल्या १०० वर्षांपासून अविरत चालू आहे हा दिवा! गिनीज बुकात नोंद झालेल्या ‘या’ दिव्याचे नाव जाणून घ्या….

“काय ती नाकाने शिट्टी वाजवते?” असे एकाने आश्चर्य व्यक्त केले आहे. “मला व्हिडीओमध्ये नक्की काय घडतंय हे समजण्यासाठी कॅप्शन वाचावं लागलं, पण या मुलीची कला कमाल आहे” असे दुसऱ्याने कौतुक केले. “माझ्या पाळीव कुत्र्याचेही लक्ष हिच्या शिट्टीने वेधून घेतले”, असे तिसरा म्हणतो; तर शेवटी चौथ्याने, “मी आजवर पाहिलेली सर्वात विचित्र, पण भन्नाट कला आहे” असे लिहिले आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत ६२६K इतके व्ह्यूज आणि १७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Story img Loader