जगातील सर्वोत्तम गुंतवणूकदार म्हणून वॉरन बफे यांच्याकडे पाहिले जाते. २००८ मध्ये जगातील श्रीमंताच्या यादीत ते अव्वल होते. ‘बर्कशायर हॅथवे’ या गुंतवणूक कंपनीचे अध्यक्ष व प्रमुख अधिकारी असलेल्या वॉरन बफे यांच्यासोबत जेवण करण्यासाठी चक्क १७ लाख रूपयांची बोली लागली आहे. त्यांची एक भेट घेण्यासाठी जगभरातील उद्योगपती महिनोंमहिने ताटकळत असतात. याच पार्श्वभूमीवर बोली लावून भेट देण्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. गेली १८ वर्षे हा अभिनव प्रयोग सुरू असून यंदाचे हे १९ वे वर्ष आहे. यातून मिळणारी रक्कम सॅन फ्रान्सिस्को येथील ग्लाईड या चॅरिटेबल ट्रस्टला दान केली जाते. आजवर बफे यांनी या संस्थेला २१० कोटी रूपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे.
२७ मे रोजी बोली प्रक्रियेला सुरुवात झाली असून ३१ मे सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कमीत कमी ३५ हजार रूपये खर्च करावे लागतील. बोली जिंकणाऱ्या व्यक्तीला त्याच्या सात आप्तेष्टांसह बफे यांच्यासोबत जेवण करण्याची संधी मिळणार आहे.
२००० साली पहिल्यांदा एका व्यक्तीने १७ लाख ५० हजार रूपये खर्च करून बफे यांची भेट मिळवली होती. त्यानंतर सन २०१२ साली आजवरची सर्वात मोठी बोली लावण्यात आली. ही बोली जिंकणाऱ्या व्यक्तीने तब्बल २५ कोटी रूपये खर्च करून बफे यांच्यासोबत जेवण केले होते. गेल्या वर्षी २२ कोटी ९६ लाख रूपये खर्च करून एकाने त्यांच्या सोबत जेवण करण्याचा मान मिळवला. या वर्षी ही बोली १७ लाख ५० हजार रूपयांपर्यंत पोहोचली आहे.