Madhya Pradesh Teacher Serving Alcohol To Students Video: आई-वडिलांनंतर प्रत्येक व्यक्तीचे चांगले आयुष्य घडवण्याचे काम शिक्षक करतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला एक आकार देतात. लहानपणापासून त्यांना चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करून देतात. त्यांच्या कलागुणांना वाव देतात, त्यामुळे आयुष्यात चांगले शिक्षक मिळणे फार महत्त्वाचे असते. पण, असे काही शिक्षक असतात जे विद्यार्थ्यांना घडवण्याऐवजी बिघडवण्याचे काम करतात. सोशल मीडियावर अशाच एका शिक्षकाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तो चक्क विद्यार्थ्यांना दारूचा पॅग कसा बनवायचा हे शिकवून त्यांना दारू पाजताना दिसतोय. या घटनेचा व्हिडीओ पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशातील काटली जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील हा शिक्षक आहे.

या घटनेचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल होताच संबंधित शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, व्हिडीओमध्ये दिसतेय की शिक्षक एका बंद खोलीत बसून जवळपास सात अल्पवयीन शाळकरी मुलांना कपमध्ये दारूचा पॅग कसा बनवायचा हे सांगत आहे. तसेच एकाला कपमध्ये दारू देत ती पिण्यापूर्वी त्यात पाणी मिसळण्यास सांगत असल्याचे ऐकू येत आहे. ते विद्यार्थीदेखील अगदी चहा असल्याप्रमाणे आरामात एकामागून एक दारूचा पॅग पितायत.

दरम्यान, या घटनेतील शिक्षकाचे नाव लाल नवीन प्रताप सिंह असे आहे, जो बरवाडा ब्लॉकमधील खिरहानी गावातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत तैनात आहे.

शिक्षक विद्यार्थ्यांना पाजतोय दारू, व्हिडीओ व्हायरल ( Teacher Offered Alcohol To Students Viral Video)

व्हायरल व्हिडीओ शुक्रवारी जिल्हाधिकारी दिलीप कुमार यादव यांच्या निदर्शनास आला. यावेळी त्यांनी तातडीने जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्राथमिक शिक्षकाला तात्काळ निलंबित केले. यावेळी संबंधित शिक्षकाविरोधात जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, मुलांना दारू पिण्यास प्रोत्साहित करणे हे शिक्षक पदाच्या प्रतिष्ठेला कलंकित करण्यासारखे आहे, त्यामुळे तात्काळ निलंबित करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.