मध्य प्रदेशातील नरसिंगपूरमध्ये पोलिसांचा अमानवी चेहरा पाहायला मिळाला आहे. येथे पोलिसांनी एका महिलेला गाडीच्या बोनेटवर अर्धा किमी फरपटत नेले आहे. यासाठी कारण फक्त इतकेच होते की, महिलेने आपल्या मुलाची सुटका करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली होती. घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.
आरोपीची आई असली म्हणून काय झाले?
व्हिडिओमध्ये एक महिला पोलिसांच्या गाडीच्या बोनेटवर लटकलेली दिसत आहे. एका आरोपीची आई पोलीसांची गाडी थांबवण्यासाठी पुढे आली. मात्र तिला पोलिसांनी काही प्रतिसाद दिला नाही, त्यानंतर ही महिला गाडीच्या बोनेटला लटकली, तरीही पोलिस गाडीबाहेर आले नाहीत. याउलट त्या महिलेला पोलीस कर्मचाऱ्यांनी तसंच बोनेटवर लटकत पोलीस ठाण्यात आणले. यावेळी थोडीशी चूक हा महिलेच्या जिवावर बेतू शकली असती. या गाडीतून पोलीस संशयित ड्रग्ज तस्कर घेऊन जात होते. ड्रग्जची तस्करी केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आलेल्या आपल्या मुलाला सोडवण्याचा या महिलेचा प्रयत्न होता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ रुळात अडकला कुत्र्याचा पाय; समोरुन आली ट्रेन अन् कर्मचाऱ्यांमुळे…
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल अजमेरिया, उपनिरीक्षक संजय सूर्यवंशी आणि हवालदार नीरज देहरिया यांना तत्काळ निलंबित केले आहे. तसेच तिघांच्याही चौकशीचे आदेश दिले आहेत.
तीन पोलिस निलंबित
हे तिघे पोलिस एका खासगी कारमधून गेले होते, असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाबाबत गृहमंत्री मिश्रा म्हणाले की, आम्ही व्हायरल व्हिडिओची दखल घेतली असून तीन पोलिसांना निलंबित केले आहे. यासोबतच विभागीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. नरसिंगपूरच्या एसडीओपी भावना मारवी यांनी सांगितले की चौकशीदरम्यान आरोप सिद्ध झाल्यास नियमांनुसार आरोपी अधिकार्यांवर योग्य कारवाई केली जाईल.