Viral video: पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात. या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात. काही पर्यटक तिकडे भलतंच साहस करतानाही दिसतात. पण, असे साहस काही वेळा पर्यटकांच्या अगदी जीवावर बेतण्यासारखा प्रसंग घडतो. अशा घटना पाहता, वारंवार सांगितलं जातं की, पाण्याशी कधी खेळू नका. तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता, धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. अशाच प्रकारे काही पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत होते. परंतु, अचानक तेथील पाण्याची पातळी वाढली आणि होत्याचं नव्हतं होऊन बसलं. सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून पाण्याशी खेळणं कसं जीवावर बेतू शकतं याची कल्पना येईल.
तीन मित्र एक दगड अन् पाण्याचा प्रचंड वेग
मध्य प्रदेशातील मोरेना येथील टिकतौली या निसर्गरम्य धबधब्यावर तीन मित्रांचा अतिउत्साहीपणा अंगलट आल्याचं दिसत आहे. वाहत्या पाण्यात दाखवलेलं धाडस या तीन मित्रांना खूपच महागात पडलं आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तीन मित्र धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यावेळी अचानक वरून पाण्याचा मोठा झोत येतो आणि हे तीन तरुण ओढ्याच्या प्रवाहाबरोबर पलीकडे ओढले जातात आणि तेथे एका दगडावर अडकतात. हे सर्व काही इतक्या अचानक घडलंय की, लोकांना काही समजलंच नाही. या तीन तरुणांना वाचवतानाचा थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
रेस्क्यूचा थरार
या थरकाप उडवणाऱ्या घटनेत लोक आपला जीव वाचवण्यासाठी कसे आरडाओरड करतायत ते दिसतंय. यावेळी आजूबाजूला बरेच लोक दिसत आहेत; मात्र प्रसंगावधान ओळखून बाकी सर्व पर्यटक पाण्याच्या बाहेर आले. परंतु, हे तीन ‘अतिउत्साही’ मित्र तिथेच बसून राहिले आणि मग अचानक पाण्याचा वेग इतका वाढला की, शेवटी बचाव पथकाला त्यांची सुटका करण्यासाठी यावं लागलं. यावेळी दिसतं आहे की, त्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात एक छोटीशी हालचालही त्या तिघांना महागात पडली असती; मात्र सुदैवानं हे तिघेही बचावले आहेत. परंतु, अशा प्रकारचं धाडस जीवावर बेतू शकतं हेही या व्हिडीओतून लक्षात येतंय.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “बाबा मी सीए झाले” १० वर्षांच्या मेहनतीनंतर लेक सीए झाली; वडिलांना अश्रू अनावर; VIDEO एकदा पाहाच
या भीषण घटनेचा व्हिडीओ indiainrecent24hr नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. एका युजरनं, “अनेकदा इशारा देऊनही लोक पाण्याखाली जातात आणि तेथे अंघोळ करतात. त्याचाच दुष्परिणाम म्हणजे हा अपघात आहे.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “तेव्हा निसर्गाशी खेळ करू नये.”