असे म्हणतात की देव सगळीकडे सर्वांचे रक्षण करू शकत नाही, म्हणूनच त्याने ‘आई’ पाठवली आहे. सर्व दु:खांशी लढून आई आपल्या मुलाचे रक्षण करते त्याला प्रत्येक संकटातून वाचवते. मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील बांधवगढ व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला लागून असलेल्या रोहनिया गावात एका १५ महिन्यांच्या बाळाला वाघाने जबड्यात पकडले आणि त्याला घेऊन जाऊ लागला. मात्र त्या मुलाची आई वाघासमोर उभी राहिली आणि तिने आपल्या निरागस मुलाला वाघाच्या जबड्यातून लढत सुखरूप बाहेर काढले. सध्या दोघांवर उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
या घटनेत निष्पाप बालकासह आईही जबर जखमी झाली आहे. आई व बाळाला उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्र मानपूर येथे दाखल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर रोहनिया गावात खळबळ उडाली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
( हे ही वाचा: सिंहणींच्या कळपाने एका झटक्यात केली बिबट्याची शिकार; व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल)
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उमरिया जिल्ह्यातील मानपूर पोलिस स्टेशन अंतर्गत बांधवगड व्याघ्र प्रकल्पात असलेल्या रोहनिया गावात पहाटे सर्व सुरळीत चालू होते. सर्व गावकरी आपापल्या कामात व्यस्त होते. दरम्यान, रात्री १० वाजता भोला प्रसाद यांच्या घरामागील झुडपात लपलेल्या वाघाने अचानक हल्ला करून १५ महिन्यांच्या मुलाला जबड्यात पकडले आणि घेवून जात होता. हे पाहून तेथे उपस्थित असलेल्या मुलाच्या आईने आपल्या जीवाची पर्वा न करता वाघाशी भिडली. आई समोर आल्यावर वाघाने मुलाला सोडून आईवर हल्ला केला. असे असूनही धाडसी आई वाघाशी लढत राहिली. अखेर आईच्या जिद्दीपुढे वाघाचा जबडा कमकुवत झाला आणि हार मानून वाघाने पळ काढला.