मध्य प्रदेशमधील इंदौरमध्ये पावसासाठी चक्क दोन पुरुषांचं लग्न लावून देण्यात आलंय. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने पाठ फिरवली असून इंद्रदेवाला खूश करण्यासाठी दोन पुरुषाचं लग्न लावण्याची एक अजब प्रथा आहे. प्रतिकात्मक स्वरुपात हे लग्न लावले जाते. हे लग्न सुरु असताना वरुण राजाने हजेरी लावल्याचा दावा ग्रामस्थ करत असून हे शुभसंकेत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
इंदौरमध्ये चांगला पाऊस आणि शेती चांगली व्हावी यासाठी चक्क दोन पुरुषांचं लग्न लावलं जातं. नुकताच इंदौरमध्ये हा सोहळा पार पडला. हिंदू प्रथेप्रमाणे थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. लग्नमांडवात वाजत- गाजत वरात आली. वरातीमध्ये ग्रामस्थ वऱ्हाडी म्हणून सहभागी झाले होते. हिंदी गाण्यांवर सर्वांचीच पावले थिरकली. यानंतर लग्न मांडवात नवरदेवाच्या वेशात दोन तरुण दाखल झाले. फक्त त्यांच्यासोबत वधू नव्हती. सखाराम आणि राकेश अशी नवरदेवांची नावे आहेत. प्रतिकात्मक स्वरुपात आणि परंपरेचा भाग म्हणून हे लग्न लावून देण्यात आले. ‘आपण पाश्चिमात्य संस्कृती स्वीकारली. समलिंगी विवाह आणि लिव्ह इन रिलेशनशिपचे अनुकरण केले. पण आम्ही दोन पुरुषांचं लग्न लावलं ते इंद्रदेवाला खूश करण्यासाठी. यामुळे चांगला पाऊस होईल अशी आमची धारणा आहे’ असे आयोजक रमेशसिंह तोमार यांनी सांगितले. विशेष म्हणजे ज्या दोन पुरुषांचं लग्न लावण्यात आले ते आधीपासूनच विवाहित आहे. हा प्रतिकात्मक विवाह सोहळा आटोपल्यावर दोघेही स्वगृही परतले. आता या विवाह सोहळ्याने खरंच पाऊस पडणार का हा प्रश्न असला तरी या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
#MadhyaPradesh: Two men married each other in Indore's Musakhedi as a 'symbolic gesture' to appease the rain gods. pic.twitter.com/N5V1KJkkkr
— ANI (@ANI_news) August 5, 2017