महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु केली असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात मात्र त्यांना रोखण्याची तयारी सुरु झाली आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे. केवळ इशारा देऊन बृजभूषण थांबलेले नाहीत तर त्यांनी नंदिनी येथे साधुसंत आणि नागरिकांसोबत बैठकीचं आयोजन करुन स्थानिकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु केलाय. एकीकडे प्रत्यक्षामध्ये राज यांना विरोध केला जात असतानाच दुसरीकडे राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी समाज माध्यमांवरही बृजभूषण शरद सिंह यांच्या समर्थकांनी मोहीम सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांच्या समर्थकांनी राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी एक गाणंही तयार केलंय.
माफी मांगो राज ठाकरे असं या गाण्याचं नाव असून उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक स्तरावरील चित्रपटांसाठी ज्या पद्धतीने उडत्या चालीवर गाणी रचली जातात तशीच या गाण्याची चाल आहे. महेश निर्मोही यांनी या गाण्याला आवाज दिला असून गाण्याचे बोल कवि योगेश दास शास्त्री यांचे आहेत. गाण्याला संगीत बब्बन आणि विष्णू यांनी दिलं आहे. “कदम नही रखने देंगे ये नेताजीने ठाणा हैं… माफी मांगो राज ठाकरे अगर अयोध्या आना हैं… माफी मांगो राज ठाकरे अगर अयोध्या आना हैं,” असे या गाण्याचे बोल आहेत, या गाण्याची एक क्लिप सध्या व्हायरल झाल्याचं पहायला मिळत आहे.
राज्यात अचानक आक्रमक हिंदुत्वाचे राजकारण करू लागलेले राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे जाहीर केले आहे. पण त्यांच्या दौऱ्यापूर्वीच भाजपाचे कैसरगंजचे खासदार बृजभूषण सिंह यांनी स्वत:ला प्रसिद्धीच्या झोतात आणि स्वपक्षाला अडचणीत आणले आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपाचे नेते राज ठाकरे यांची पाठराखण करत असले तरी उत्तर प्रदेशातील भाजपा खासदाराने मात्र राज यांना आव्हान दिले आहे.