Prayagraj Mahakumbh Mela 2025: भारतीय संस्कृतीत कुंभमेळ्याला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. प्रत्येक १२ वर्षांनी चार पवित्र ठिकाणी (प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक) हा मेळा भरतो. या मेळ्याला हिंदू धर्मात धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. या ठिकाणी स्नान केल्याने पापक्षालन होते आणि मोक्ष प्राप्त होतो, असे म्हटले जाते. या मेळ्याचे खास आकर्षण म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केले जाते. अनेक भारतीयांना आयुष्यात एकदातरी कुंभमेळ्यात सहभागी व्हावे ही इच्छा असते. काहींची ही इच्छा पूर्ण होते तर काहींची ही इच्छा कधीच पूर्ण होत नाही. सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होतोय, ज्यात एक व्यक्ती आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी आल्याचे दिसत आहे.
२०२५ चा हा महाकुंभमेळा खूप खास असल्याचे म्हटले जात आहे. कारण दर १२ वर्षांनी होणारा हा कुंभमेळा १४४ वर्षांनंतर खास संयोग निर्माण करत आहे. हा कुंभमेळा १३ जानेवारीपासून ते २६ फेब्रुवारीपर्यंत असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सोशल मीडियावर यादरम्यानचे अनेक व्हिडीओ, फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यात अनेक नागा साधू, विविध संत, ऋषी यांचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. अशातच आणखी एक मनाला भावूक करणारा फोटो खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाही भावूक व्हाल.
पाहा व्हिडीओ:
या व्हायरल फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वृद्ध व्यक्ती एका वृद्ध महिलेचा फोटो हातात घेऊन कुंभमेळ्यात पोहोचला असून यावेळी तो फोटो हातामध्ये घेऊनच त्रिवेणी संगमावर स्नान करतो. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीने फोटोतील वृद्ध महिला त्या व्यक्तीचा आई असल्याचे लिहिले आहे. त्या व्यक्तीच्या आईची कुंभमेळ्यात स्नान करण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याने तो आईचा फोटो घेऊन कुंभमेळ्यात आल्याचे लक्षात येत आहे.
हा फोटो इन्स्टाग्रामवरील @the_ultimate_trolls_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये, “बाबा महाकुंभमेळ्यात आईचा फोटो घेऊन गेले आहेत आणि फोटोलादेखील त्यांनी पवित्र स्नान घातले आहे,” असे लिहिले आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास ९९ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.