विविधतेने नटलेला महराष्ट्र, या राज्यातच अनेक संस्कृती वसल्या आहेत असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. पवालो पावली इथली खाद्यसंस्कृती बदललेली पाहायला मिळेल, पण असे असले तरी या राज्याने सीमेपलीकडलच्या खाद्यसंस्कृतीलाही आपलेसे केले आहे. सकाळच्या न्याहारीत आता कांदेपोहे, शिरा, उपमा, पोळी भाजी, आंबोळ्याबरोबर डोसा, इडली, पाव, कॉर्न फेक्स असेही पदार्थ दिसू लागले आहेत. या पदार्थांच्या यादीत आणखी एका पदार्थांचे नाव आवर्जुन घ्यावे लागले ते म्हणजे बिस्कीट. सर्वाधिक बिस्कीटे खाणा-यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल आहे असे समोर आले आहे.
वर्षभरात महाराष्ट्रात १ लाख ९० हजार टन बिस्किटे विकली गेली आहेत. बिस्कीट उत्पादक कल्याण मंडळाने केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार २०१६ मध्ये भारतात ३६ लाख टन बिस्कीटांची विक्री झाली. या विक्रीत दरवर्षी ८ ते १0 टक्क्यांची भर पडत असल्याचेही या सर्व्हेक्षणात म्हटले आहे. सध्याच्या घडीला देशात बिस्किटांची विक्री ३७ हजार ५०० कोटींवर पोहोचली आहे, आणि सर्वाधिक मागणी ही महाराष्ट्रात असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात ग्लूकोज, मारी आणि मिल्क बिस्कीटांना मोठी मागणी आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक बिस्कीटे खाणा-या राज्यात उत्तरप्रदेश व उत्तराखंडाचा समावेश आहे. येथे १ लाख ८५ हजार टन बिस्कीटांची विक्री झाली. त्या खालोखाल तामिळनाडू आहे. येथे १ लाख ११ हजार तर पश्चिम बंगालमधे १ लाख २ हजार टन बिस्किटे खपली आहेत.
पण पंजाब, हरियाणा, ओडिशा यांसारख्या राज्यात मात्र बिस्कीटांना पुरेशी मागणी नाही. या राज्याने मात्र याकडे काहीशी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहेत. या राज्यांत ३९ ते ५२ हजार टनांच्या आसपासच बिस्कीटांची विक्री झाली असल्याचे दिसून येत आहे. व्यग्र जीवनशैलीत खाद्याच्या आवडीनिवडीही बदलू लागल्या आहेत. आज स्वस्थ बसून न्याहारी करायलाही कोणाला वेळ नाही, अशावेळी प्रवासात अनेकांची बिस्कीटांना पसंती असते. त्यातून हल्ली बिस्कीट देखील पौष्टीक असल्याचा दावा अनेक कंपन्यांकडून केला जातो त्यामुळे साहजिक न्याहरीत किंवा खाद्यपदार्थांच्या यादीत बिस्कीटांचे महत्त्व वाढत चालले आहे.