Maharashtra CM Oath Ceremony: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळपास पंधरवडा उलटत आल्यावर अखेर आज राज्यात स्पष्ट बहुमत मिळवलेल्या महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. आज मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा होईल. या सगळ्यात लक्षवेधी बाब म्हणजे या शपथविधीसाठी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांसाठी खास संत तुकाराम महाराज केशर पगडी तयार करण्यात आली आहे. या विशेष पगडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असं काय खास आहे या पगडीत? जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील गिरीश मुरुडकर आणि सहकार्यांनी या सर्व पगड्या तयार केल्या आहेत. यातील ‘संत तुकाराम महाराज केशर पगडी’ ही खास सुती कापडात बनवली आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना हीच पगडी घालतील असं म्हटलं जातेय. शपथविधीत फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांसाठी या पगडीसह आणखी काही पगड्या तयार केल्या आहेत. गिरीश मुरुडकर फेटेवाले यांना महायुतीच्या घटकपक्षांकडून या विशेष पगड्यांसाठीची ऑर्डर देण्यात आली आहे. संत तुकाराम महाराज केशर पगडीसह राजबिंडा केशरी फेटा, गुलाबी फेटे, विशेष फेटे, उपरणेही तयार केले आहेत. तुम्हाला या खास पगड्या कशा वाटल्या? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला!
मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी ११ किंवा १२ डिसेंबरला करण्याचे ठरविण्यात आले आहे. मंत्रीपदासाठी कोणाला संधी द्यायची, खातेवाटप आणि मंत्रीपदांच्या वाटपाचा पेच यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपूर्ण मंत्रिमंडळाचा जंगी शपथविधी करण्याचे नियोजन तूर्तास फिसकटले आहे. मात्र महायुतीतील पेच सोडविण्यासाठी फडणवीस आणि शिंदे यांच्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरु होत्या आणि फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.