कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी एल्गार केला आहे. शेतकरी संपाची झळ महानगरांना बसू लागली आहे. शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्यामुळे राज्यातील बऱ्याचशा भागातील कृषी मालाचे व्यवहार आणि वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक भागांमध्ये शेतीमाल, दूध घेऊन जाणारी वाहने अडवली जात आहेत. शेतीमाल रस्त्यावर फेकून देण्याच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून दिल्याचेही चित्र पाहायला मिळते आहे. मात्र शिर्डीत संप कायम ठेवत एका तरुणाने दुधाची नासाडी टाळली आहे.
अन्न हे पूर्णब्रह्म असते, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे. त्यामुळेच अन्नाची नासाडी करु नये, असे संस्कार आपल्यावर लहानपणी केले जातात. त्याचाच प्रत्यय अहमदनगरमधील शिर्डीत आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून टाकले जात असताना एका तरुणाने दुधाचे मोफत वाटप केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दलचा व्हिडिओ ट्विट केला आहे. एका तरुणाने मोटारसायकल थांबवत गावातील लहान मुलांना मोफत दूध वाटले आहे. तरुण मोफत दूध वाटप असल्याचे पाहताच गावातील अनेक लहान मुले त्याच्या मोटारसायकलजवळ आली आणि तरुणाने सर्व लहानग्यांना मोफत दूध दिले.
#WATCH: Man distributes milk in Maharashtra’s Shirdi as a part of farmers’ protest demanding crop loan waiver and better procurement prices pic.twitter.com/Nz8ZAyklzW
— ANI (@ANI_news) June 2, 2017
शेतकरी मोठ्या कष्टाने आणि परिश्रमातून शेतमाल पिकवतो. शेतकरी आपल्या पिकाला अगदी मुलाप्रमाणे जपतो. त्यामुळे हा शेतमाल वाया जात असताना शेतकऱ्याला किती यातना होत असतील, याची कल्पना करणे कठीण आहे. त्यामुळेच की काय, शिर्डीतील तरुणाने दूध रस्त्यावर ओतण्यापेक्षा ते गरिब मुलांना मोफत वाटणे पसंत केले. ‘अन्नधान्य वाया जाण्यापेक्षा ते कोणाच्या तरी मुखाला लावावे,’ अशी शिकवण वडिलमंडळी कायम देतात. शिर्डीतील या तरुणाने ही शिकवण प्रत्यक्षात आणली आहे. दूध वाया न घालवता, ते गरिब मुलांना मोफत वाटण्याची या तरुणाची कृती नक्कीच स्तुत्य आहे.