Kolhapur mother save son life: आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. ‘माय असे उन्हातील सावली, माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल, यावीत आता दु:खे खुशाल’ अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. नेहमी आपल्या मुलांच्या पाठीशी असलेली आई वेळ आली, तर सैतानालाही धूळ चाखवू शकते, याचे उत्तम उदाहरण आजच्या या व्हायरल व्हिडीओतून दिसून येत आहे. कोल्हापुरातील एका रणरागिणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या मुलावर तलवारीने सपासप वार करणाऱ्या हल्लेखोरांना ही आई अशी भिडली आहे की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
काय आहे प्रकरण?
मायलेकरांवर ओढवलेली ही दुर्घटना कोल्हापुरातील आहे. व्हायरल झालेल्या या दुर्घटनेच्या व्हिडीओतून हे दिसून आले की, एक व्यक्ती रस्त्याच्या बाजूला दुचाकीवर बसली होती. यावेळी त्याची आई त्याच्या बाजूला उभी होती आणि ते दोघेही आपल्या संभाषणात व्यग्र होते. अशातच अचानक मागून तीन जण एका स्कुटीवर बसून त्यांच्यासमोर येतात आणि त्या मुलावर हल्ला करू पाहतात. यावेळी हल्लेखोर चक्क तलवार घेऊन त्या मुलाला मारण्यासाठी आलेले असतात. हल्लेखोर चपळतेने त्यांचे लक्ष नसताना त्याच्यावर तलवारीने हल्ला करतात; मात्र तो त्या निर्घृण हल्ल्यातून थोडक्यात वाचतो आणि गाडीसकट खाली पडतो. मुलावर तलवारीने वार केल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आई त्यांच्यावर दगडांचा मारा करते.
शेवटी काय झालं पाहा
शेवटी या हल्लेखोरांना तिथून पळून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. ही संपूर्ण घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्यामुळे या व्हिडीओद्वारे वृद्ध आईचे ममत्व आणि त्यातून तिच्यात संचारलेली ताकद यांचा मिलाफ जगासमोर आला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापुरातल्या जयसिंगपूर परिसरात ही जीवावर बेतणारी दुर्घटना घडली; पण आईच्या दुर्दम्य धाडसामुळेच तिचा लेक वाचला. या ठिकाणी किरकोळ बाचाबाची झाली होती आणि त्यातून दोघांमधील वाद वाढला होता. मग कसेबसे प्रकरण शांत झाले आणि सगळे निघून गेले. मात्र, त्यानंतर पुन्हा हे हल्लेखोर या ठिकाणी आले आणि त्यांनी हल्ला केला
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; लोकांच्या किंकाळ्या अन् भूस्खलनाचा काळजात धडकी भरवणारा VIDEO
आई आपल्या मुलांवर नि:स्वार्थी प्रेमाचा वर्षाव करते, अडी-अडचणीत सापडलेल्या मुलाला जीवाची पर्वा न करता संकटातून सहीसलामत बाहेर काढते, हे सर्वश्रुत आहेच. दरम्यान, कोल्हापुरातल्या या दुर्घटनेनेही पुन्हा हे सिद्ध केले. नेटकरीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत या महिलेचे कौतुक करीत आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd