महाराष्ट्राच्या औरंगाबादमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाने स्वतः नापास होण्याचा ठपका त्याच्या प्रेयसीवर ठेवलाय. एवढ्यावरच न थांबता या तरुणाने प्रेयसीकडे वर्षभराची संपूर्ण फी परत करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रियकराविरोधात धमकावणे, छळवणूक आणि फसवणूक अशा आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे.

मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या तरुणाने गेल्या वर्षीच ‘बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिकल अँड सर्जरी’च्या शिक्षणासाठी औरंगाबादच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. आरोपी तरुण हुशार होता, पण तो अभ्यासावर लक्ष केंद्रीत करु शकला नाही. परिणामी पहिल्या वर्षी तो नापास झाला, त्यामुळे अर्थातच त्याला दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे त्याने प्रेयसीवरच तुझ्यामुळे मी नापास झालो असा आरोप लगावला आणि त्याचसोबत माझ्या पालकांनी संपूर्ण वर्षभराची भरलेली माझी फी परत कर अशी मागणी केली.

तरुणाकडून झालेल्या अशाप्रकारच्या आरोपांमुळे दुखावलेल्या प्रेयसीने त्याच्याशी बोलणं बंद केलं आणि त्याच्यापासून दूर राहणंच पसंत केलं. पण तरीही तो तिला मेसेज आणि वारंवार फोन करुन त्रास देत होता. तिने सोडल्याच्या रागात त्याने सोशल मीडियावर तिच्याबाबत उलटसुलट पोस्ट करण्यास सुरुवात केली, तसंच तिच्या कुटुंबियांबाबतही अवमानकारक लिखाण केलं. याशिवाय तिचे फोटो देखील सोशल मीडीयावर अपलोड करण्याची त्याने धमकी दिली. त्यामुळे या त्रासाला कंटाळलेल्या तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली.