World Day Against Child Labour : दरवर्षी १२ जून हा जागतिक बालकामगार प्रतिबंध दिवस पाळला जातो. जगभरात बालमजुरी थांबवणे हा उद्देश समोर ठेऊन हा दिवस पाळला जातो. १४ वर्षांखालील मुले जे मजुरी करतात त्यांना बालकामगार म्हटले जाते. या मुलांनी नोकरी न करता शिक्षण घ्यावे, हा उद्देश समोर ठेवत आंतरराष्ट्रीय कामगार संघाने २००२ या वर्षी जागतिक बालकामगार विरोधी दिनाची सुरूवात केली. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पोलिसांनी एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी जागतिक बालकामगार प्रतिबंध दिवसानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक वाक्य लिहिलेय. ते वाक्य या प्रमाणे – “मी बालकामगार आहे” त्यानंतर व्हिडीओत खोडरबरनी बालकामगार या शब्दातील काही अक्षरे खोडली जातात आणि पुढे वाक्य निर्माण होते – “मी बालक आहे”
पाहा पोस्ट
DGPMaharashtra या अधिकृत एक्स अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली असूनया व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,
“त्यांना शिकू द्या, त्यांना घडू द्या
त्यांना कामाला जुंपू नका, त्यांना झेप घेऊ द्या!
SayNoToChildLabour”
महाराष्ट्र पोलीस DGPMaharashtra या एक्स अकाउंटवरून असे अनेक संदेश, सुविचार शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक क्रिएटिव्ह पोस्ट शेअर केली होती. बोटांच्या ठसाचा फोटो शेअर करत या ठसाला दोन भागात विभागले होते आणि निसर्ग आणि तंत्रज्ञानामध्ये साम्य दाखवले होते. या फोटोला कॅप्शन लिहिले होते, “निसर्ग किंवा तंत्रज्ञान दोन्हीकडे संरक्षण व संवर्धन महत्त्वाचे! #जागतिकपर्यावरणदिन #WorldEnvironmentDay #TwoStepVerification #ProtectAndSave”
आपल्या देशात १९८६ साली बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा लागू करण्यात आला; पण या कायद्यात अनेक पळवाटा आहेत. एकीकडे १८ वर्षांखालील प्रत्येक व्यक्ती म्हणजे ‘मूल’ अशी व्याख्या केली जाते, प्रत्येक मुलाला शाळेतले औपचारिक शिक्षण मिळालेच पाहिजे, असेही सांगितले जाते, तर दुसरीकडे बालकामगार कायद्यानुसार फक्त १४ वर्षांखालील मुलाला कामावर ठेवणाऱ्या व्यक्तींवरच कारवाई करण्याची तरतूद आहे. निदान आपल्या घरात तरी एखाद्या १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीला लहान मुलांना सांभाळण्यासाठी ठेवणे आपण टाळायला पाहिजे.