Supriya Sule and Gaurav Mehta Bitcoin Scam Audio Fact Check : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान बिटकॉइन स्कॅमचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसतोय. या संदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ऑडिओ क्लिपदेखील खूप व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि गौरव मेहता (जो ऑडिट फर्म सारथी असोसिएट्सचा कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे.) यांच्यातील फोन कॉलची ती ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला जात आहे. त्यात सुप्रिया सुळे यांनी बिटकॉइन्सच्या बदल्यात रोख रकमेची मागणी करीत संबंधित व्यक्तीला “चौकशीची काळजी करण्याची गरज नाही. कारण- आम्ही सत्तेवर आल्यावर याबाबत काळजी घेऊ”, असे आश्वासन दिल्याचा दावाही केला जात आहे. याच ऑडिओ क्लिपवरून आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेय. पण या ऑडिओ क्लिपमागे नेमके किती तथ्य आहे ते जाणून घेऊ या…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर BJYM ने ३३ सेकंदांची ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे.
इतर युजर्सदेखील तीच ऑडिओ क्लिप शेअर करत आहेत.
तपास:
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजे १९ नोव्हेंबरला भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्या व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा बिटकॉइन घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप केला. त्यानंतर एक्सवर ही ऑडिओ नोट्स व्हायरल व्हायला सुरुवात झाली. मात्र, सुप्रिया सुळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, त्यांनी भारत निवडणूक आयोग (ECI) आणि सायबर गुन्हे विभागाकडे फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
त्यानंतर आम्ही ऑडिओ क्लिपचा व्हिडीओ डाउनलोड केला आणि त्यातून व्हायरल ऑडिओ बाहेर काढला.
त्यानंतर आम्ही InVid ॲडव्हान्स टूल्समध्ये एम्बेडेड Hiya वापरून ऑडिओचे विश्लेषण केले. यावेळी ऑडिओ विश्लेषणात असे दिसून आले की, त्यातील ९८ टक्के भागाचे ‘व्हॉइस क्लोनिंग’ करण्यात आले आहे.
आम्ही तो ऑडिओ AI डिटेक्टर ऑडिओ टूल HIVE मॉडरेशनद्वारेही तपासला.
HIVE मॉडरेशननेही असेच सुचवले की, संबंधित व्हॉईस क्लिप ९९.९ टक्के AI-जनरेटेड आहे.
लाइटहाऊस जर्नलिझमने निरीक्षण केले की, एक्सवर अगदी सारखी तीच ऑडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली की, संबंधित सगळ्या ऑडिओ क्लिप्स खोट्या आहेत. त्यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार केली असल्याचेही सांगितले.
निष्कर्ष:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) नेत्या सुप्रिया सुळे यांनी बिटकॉइनच्या बदल्यात रोख रकमेची मागणी केल्याबाबतची व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप AI-जनरेटेड आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या नावे बिटकॉइन घोटाळ्यासंबंधाने व्हायरल होणारे सर्व दावे खोटे आणि बनावट आहेत.