‘मुलगी म्हणजे परक्याचं धन’, ‘दिल्या घरी ती सुखी रहा’ वगैरे टिपिकल वाक्यं राजरोसपणे कानावर पडण्याचे दिवस आता मागे पडले असले तरी अनेकांच्या मनात ही वाक्य आजही स्पष्टपणे असतात. माॅडर्न वगैरे झालं तरी ‘आपल्याही काही परंपरा आहेत हो’. मुलाचं ‘लग्न होतं’ आणि मुलीला ‘दुसरं घर मिळतं’. मग आपल्या नावापासून सवयींपर्यंत आपल्या सुनेनं सर्वकाही बदलावं अशी सासरच्यांची अपेक्षा असते. तरी आता लग्न झालेल्या मुली आपलं माहेरचं आणि सासरचं अशी दोन्ही आडनावं लावत यातून मध्यममार्ग काढतात. पण याही बाबतीत तडजोड करावी लागते ती मुलींनाच!
पण आता एका मुलाने लग्न झाल्यावर त्याचं आडनाव बदलत एक नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केलाय. मराठमोळ्या अभिषेक मांडेने लग्न झाल्यावर त्याच्या पत्नीचं आडनाव लावत त्याचं नाव अभिषेक मांडे- भोत असं केलं आहे.
आणि हे त्याने स्वत:च्या मर्जीने केलं आहे.
अभिषेकच्या बायकोचं नाव आहे कर्मिन भोत. पारशी समाजातली कर्मिन आणि मराठी कुटुंबातल्या अभिषेकचे सूर जुळले आणि त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला.
स्त्रियांच्या हक्काांविषयी अभिषेकला कमालीची कळकळ आहे. लग्नानंतर स्त्रियांवर येणाऱ्या बंधनांच्या अभिषेक विरोधात होता. आणि या परंपरेत बदल करायला त्याने स्वत:पासूनचं सुरूवात केली. आणि आपल्या नावासोबतच बायकोचं नाव लावायचा निर्णय घेतला.
“लहानपणापासूनच अभिषेकच्या घरात त्याला त्याच्या आईबरोबर अनेक खंबीर स्त्रियांचा सहवास अभिषेकला लाभला. त्याने घेतलेल्या या निर्णयानंतर कमीपणाची किंवा त्याच्यावर काही लादलं गेल्याची भावना त्याच्यामध्ये मुळीच नाही” कर्मिन ने माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं.
याहीपुढची बाब म्हणजे अभिषेकपेक्षा कर्मिन मोठी आहे आणि तिचा पगारही त्याच्यापेक्षा जास्त आहे!
प्रेमाच्या बाबतीत, लग्नाच्या बाबतीत तथाकथित रूढी, परंपरा मध्ये याव्यातच कशाला? जोपर्यंत हे पती-पत्नी एकमेकांसोबत सुखी आहेत तेव्हा त्यांना आडकाठी करण्याचा प्रश्नच कुठे येतो?
अभिषेक- कर्मिनच्या लग्नामुळे आणि अभिषेकने घेतलेल्या निर्णयामुळे ही बाब ठळकपणे अधोरेखित होते!