Viral Video: महाराष्ट्र आणि मराठी माणूस या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सतत वाद पेटत असल्याचे पाहायला मिळते. कधी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून तर कधी भाषेवरून हा वाद सुरूच असतो. हल्ली दिवसेंदिवस वाढणाऱ्या बेरोजगारीमुळे मराठी माणसालाच मुंबईत नोकरी मिळत नाही, त्यांच्या मुलांना हव्या त्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळत नाही. जिथे-तिथे आरक्षण किंवा परप्रांतीयांची वाढती संख्या हा मुद्दा डोकावतो. यांसारख्या अनेक गोष्टींचा राग सामान्य मराठी माणसाच्या मनात खदखदत असतो. सध्या अशाच एका मराठी माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात तो त्याच्या मनातील धुमसता असंतोष बोलून दाखविताना दिसत आहे.
तसं पाहायला गेलं, तर संपूर्ण भारतात प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही राज्यात वास्तव्य करण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे. परंतु याच स्वातंत्र्यामुळे जेव्हा तिथल्या स्थानिक लोकांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतो, तेव्हा त्या लोकांच्या मनात परप्रांतीयांविषयी राग निर्माण होतो. महाराष्ट्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा अनेक शहरांमध्ये अनेक उद्योग विकसित झाले आहेत, त्यामुळे अनेक परप्रांतीय त्यांचे राज्य सोडून महाराष्ट्रात येतात. अशाच मुद्द्यावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील पुरुष बोलताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीच्या वेळी मुंबई लोकलमध्ये एक पुरुष सीटवर बसला असून, तो अर्वाच्य भाषेत मनातील राग व्यक्त करताना दिसत आहे. यावेळी तो म्हणतोय, “षंढ आहोत आम्ही… आमच्या महाराष्ट्रावर राज्य केलंय… तुम्ही.. मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्र राज्यही फक्त मराठी माणसाचं आहे; बाकी कुणाचंही नाहीये. महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, मुंबईत राहणारे तुम्ही भिकारी आहात…भिकारी… आमच्या राज्यात भीक मागायला येता तुम्ही… लाचार आहात… तुम्ही, मला अभिमान आहे साहेबांचा माझ्या बाळासाहेब ठाकरेंचा, माझ्या शिवाजी राजांचा ज्यानं अफजलखानाला कापलं. या… माझ्या हृदयात साहेब राहतात आणि शिवाजी महाराजही राहतात. या तुम्हाला ३० जणांना उभा कापेल ना त्या वेळेला मी माझ्या मालवणचं नाव सांगेल, वेंगुर्ल्याचं. मराठा तुम्ही कमी समजू नका, मराठा हा मराठा आहे. मराठा जेव्हा कापतो ना त्या वेळेला सगळ्यांची खल्ली-वल्ली करून टाकतो. आमच्या महाराष्ट्रावर आमच्या आया-बहिणींवर तुम्ही डोळा ठेवला रे. तुमच्या राज्यात जा परत, आमच्या महाराष्ट्रात येऊ नका तुम्ही. ही मुंबई माझ्या ठाकरेंची आहे. फक्त माझ्या उद्धवची आणि फक्त माझ्या राजची आहे.”
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vishayaika या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करीत आहेत. एकानं लिहिलंय, “Real Fact हा मनातून निघालेला राग आहे. जय महाराष्ट्र”. दुसऱ्याने लिहिलंय, “जय महाराष्ट्र, जय शिवराय! अगदी मनातील भावांचा उद्रेक झाला. म्हणून आतील ज्वालामुखी बाहेर पडला”. आणखी एकानं लिहिलंय, “राज-उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं काळाची गरज आहे”.