महिंद्रा एक्सयूव्ही ७०० (Mahindra XUV700) ही कार ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) या वैशिष्ट्यासह भारतीय बाजारपेठेत आली आहे. या हाय-एंड कारमध्ये उपलब्ध असलेले हे खास वैशिष्ट्य ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आहे पण, या एसयूव्ही मॉडेलच्या कारचे मालक असलेले भारतीय ग्राहक त्याचा गैरवापर करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर लक्ष वेधण्यासाठी या वैशिष्ट्याचा महिंद्रा एक्सयूव्ही७००चा गैरवापर करतानाचे व्हिडीओ वारंवार पोस्ट केले जात आहेत. दरम्यान, आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये कारचा ड्रायव्हर मागच्या सीटवर बसलेला दिसत आहे आणि ड्रायव्हरची जागा रिकामी ठेवलेली आहे.
हा धक्कादायक व्हिडीओ एक्स्ट्रीम मोटिव्हेटर २१९ (xtreammotivators219) या यूट्युब पेजवर शेअर करण्यात आला आहे; ज्यामध्ये ‘एडीएएस’ वैशिष्ट्याचा गैरवापर केला जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिंद्रा एक्सयूव्ही७०० ही कार महामार्गावर प्रवास करीत आहे आणि वाहनचालक मागच्या सीटवर बसून वाहनाचा व्हिडीओ बनवत आहे. दरम्यान, स्वयंचलित पद्धतीने कार सुरू असताना चालक आणि सहप्रवासीही मागच्या सीटवर बसले आहेत, असे दिसते. या व्हिडीओमध्ये पुढच्या दोन्ही सीट रिकाम्या आहेत, असे स्पष्टपणे दिसते.
हेही वाचा – तरुणाला करायचे होते मनाप्रमाणे लग्न, महादेवाची केली पूजा, इच्छा पूर्ण झाली म्हणून मंदिरातून चोरले शिवलिंग
‘एडीएएस’ सिस्टीममध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल हे वैशिष्ट्य समाविष्ट आहे; जे ट्रॅफिकमध्ये प्रतिसाद म्हणून वाहनाचा वेग नियंत्रित करते. महामार्गावर पुरेसे लेन मार्कर असल्यास, हे सक्रिय सुरक्षा वैशिष्ट्य वाहनाला दिशा देण्यास मदत करू शकते. जेव्हा वाहनचालक त्वरित पुरेशी प्रतिक्रिया देऊ शकत नाही तेव्हा आणीबाणीच्या वेळी सुरक्षेसाठी हे वैशिष्ट्य वापरणे हा त्याचा हेतू आहे. पण, वाहनचालकांकडून मात्र त्याचा सर्रास गैरवापर होताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mahindra XUV700 मध्ये ही कार खास वैशिष्ट्य असलेल्या भारतातील काही बजेट कारपैकी एक आहे. हेच वैशिष्ट्य एक्सयूव्हीव्यतिरिक्त होंडा सिटी (Honda City), ह्युंडाई व्हेर्ना (Honda City), एमजी हेक्टर (MG Hector), टाटा हॅरियर (Tata Harrier), टोयोटा इनोवा हायक्रॉस (Toyota Innova Hycross), ह्युंडाई टक्सन (Hyundai Tucson) व बीव्हायडी अट्टो ३ (BYD Atto 3) यांसारख्या कारमध्येदेखील उपलब्ध आहे.