आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गोल्डन टायगर म्हणजे दुर्मिळ सोनेरी वाघाचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नुकताच एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) काझीरंगामध्ये आढळलेल्या सुंदर सोनेरी वाघाचा फोटो शेअर केला. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, राजेशाही थाट! काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात नुकताच एक दुर्मीळ सोनेरी वाघ दिसला.
हिमंता बिस्वा यांनी एक्सवरून दुर्मीळ सोनेरी वाघाचा फोटो शेअर करीत नागरिकांना नैसर्गिक समृद्धीबाबत सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा दिली आहे. दरम्यान, दुर्मीळ सोनेरी वाघाचे हे फोटो वन्यजीव फोटोग्राफर गौरव राम नारायणन यांनी काढले आहेत. सरमा यांनी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त या वाघाचे फोटो शेअर केला होता.
सरमा यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने ‘जंगलाचा खरा राजा’, असे म्हटले आहे. दुसऱ्याने लिहिलेय, “हे सुंदर आसाम आहे.” तिसऱ्याने आपले मत व्यक्त करीत सांगितले, “हा एक मोठा वाघ आहे आणि तो आजपर्यंत दिसला कसा नाही? हे आश्चर्यकारक आहे! सुदैवाने कोणी शिकार केली नाही. आम्हाला निश्चितपणे अधिक सतर्कतेची गरज आहे.”
सोनेरी वाघाचा हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना खूप आवडला आहे. तसेच, या फोटोने लोकांना नैसर्गिक साधनसंपत्तीच्या महत्त्वाची आठवण करून दिली आहे. त्याचे संपूर्ण संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी विशेष उपाययोजना करण्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, या सोनेरी वाघाला गोल्डन टॅबी टायगर, असेही म्हटले जाते. त्याच्या या विशिष्ट रंगामुळे तो एक दुर्मीळ प्राणी मानला जातो. दरम्यान, आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात २०२३ मध्ये या सोनेरी वाघाचे दर्शन झाले होते. त्यानंतर पुन्हा हा वाघ एका फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यात कैद झाला.