Makar Sankranti 2025 Viral Video : उत्साह आणि आनंदाचा सण म्हणजे मकर संक्रांत. त्यानिमित्त लोक पतंगबाजीचा आनंद घेताना दिसतात. पण, पतंगबाजीमध्ये लोक इतके मग्न असतात की, त्यांना हाही विसर पडतो की, त्यांच्या पतंगाचा दोर कोणाचा तरी जीवही घेऊ शकतो. आकाशात मुक्तपणे उडणाऱ्या पक्ष्यांसाठी पतंगाचा तीक्ष्ण मांजा घातक ठरतो; ज्यामुळे दरवर्षी अनेक पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो किंवा अनेक पक्ष्यांची आयुष्यात कधीही उडू न शकण्यासारखी अवस्था होते. कारण- पतंगाच्या धारदार मांजामुळे त्यांचे पंख कापले जातात. त्यामुळे तुम्ही नवीन पतंग खरेदी कराल; पण त्यामुळे धोक्यात येणाऱ्या जीवाचं काय याचा कधी विचार केलात? सध्या सोशल मीडियावर पक्ष्यांचा एक हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात मांजामुळे पक्ष्यांची जी काही अवस्था झाली आहे, ती खरंच भयानक आणि मनाला चटका लावणारी आहे.
पतंग आकाशात उंच उडून माणसांना आनंद देतो खरा; पण त्याच पतंगाचा धारदार मांजा कधी पक्ष्यांच्या उडण्याशी स्पर्धा करताना त्यांच्या पंखांना इजा करतो, तर कधी माणसांचेच गळे चिरतो. त्यामुळे मकर संक्रांतीदिनी पतंगबाजीला बंदी केली गेली नसली तरी त्यासाठी वापरला जाणारा घातक मांजा वापरणे मात्र थांबले पाहिजे, अशी मागणी दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवसांत केली जाते. दरवर्षी जखमी होणाऱ्या पक्ष्यांमुळे पतंग उडविताना विशेषत: चायनीज मांजा वापरू नये, असे आवाहन केले जाते. मात्र, त्याकडे लोक दुर्लक्ष करताना दिसतात; पण तुमचे दुर्लक्ष करणे पक्ष्यांसाठी किती जीवघेणे ठरतेय याचे विदारक दृश्य तुम्ही व्हिडीओत पाहू शकता.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, अनेक कबुतरं कशा प्रकारे पतंगाच्या मांजात गुरफटली गेली आहेत. अनेक पक्षी तर मांजामध्ये गुरफटल्यामुळे हवेत लटकलेल्या अवस्थेत आहेत. जे स्वत:हून कोणतीही हालचाल करू शकत नाहीयेत. त्यामुळे त्या गुरफटलेल्या मांजातून सुटका करून घेण्यासाठी ते मदतीची याचना करतायत. पक्ष्यांचे रक्ताळलेले गळे अन् कातरलेले त्यांचे पंख पाहून खूप दु:ख होते. यावेळी एक पक्षीप्रेमी येऊन या पक्ष्यांची सुटका करीत त्यांना जीवनदान देतो. पण, तुम्हीही पतंगबाजीचा आनंद घेताना जरा या मुक्या अन् छोट्या जीवांचाही विचार करा.
तुमचा एका दिवसाचा आनंद पक्ष्यांसाठी ठरु शकतो कायमचे अपंगत्व देणारा
कारण- तुमचा एका दिवसाचा आनंद या पक्ष्यांना कायमचे अपंगत्व देणारा किंवा जीवघेणा ठरू शकतो. पक्ष्यांचा हा हृदयद्रावक व्हिडीओ @ankush_rajpurohit_93 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे; ज्यावर अनेकांनी पतंग उडविताना पक्ष्यांच्या जीवाचाही विचार करा, असे आवाहन केले आहे.