आज आपण कुठल्याही लहान-मोठ्या शहरांमध्ये गेलो, तर पार्किंगची समस्या उदभवते. गाडी कुठे पार्क करायची? जिथे गाडी पार्क केली, तिथे ती सुरक्षित राहील का अशा चिंतायुक्त विचारांचे दडपण प्रत्येक वाहनचालकावर येते. पण, ही पार्किंगची समस्या बहुतांश व्यापाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. आज सोशल मीडियावर यासंबंधीची एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका मॉलच्या मालकाने गाड्या पार्किंगसाठी एक आश्चर्यकारक जाहिरात लावली आहे.
अनेकदा मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये खरेदी करायला जाताना ग्राहकांना वेळेचे भान उरत नाही. त्यामुळे मार्केटमधील अनेक दुकानांसमोर पार्किंग केलेल्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा दिसतात आणि ट्रॅफिक जाम होते. यावर बंगळुरूच्या एका मॉलमालकाने उपाय शोधून काढला आहे. त्याने प्रीमियम पार्किंगसाठी वाहनचालकांना शुल्क आकारले आहे. पण, हे शुल्क फक्त १००, ५०० रुपयांचे नसून चक्क १००० रुपयांचे आहे. पाहा ही पोस्ट…
हेही वाचा…पुण्यातील अजब प्रकार! रस्त्यावर खिळे टाकले अन् वाहने केली पंक्चर; पाहा व्हायरल VIDEO
पोस्ट नक्की बघा :
तुम्ही पोस्टमध्ये पाहिले असेल, ‘प्रीमियम पार्किंगसाठी प्रतितास १००० रुपये’, असे या बोर्डवर लिहिण्यात आले आहे. म्हणजेच वाहनचालकांना एक तास गाडी पार्क करण्यासाठी १००० रुपये भरावे लागणार आहेत. तर बंगळुरूच्या एका रहिवाशाने या बोर्डचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि अनेक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मॉलमालकाने मॉलसमोर जास्त वेळ गाड्या पार्क करून ठेवू नयेत आणि गाड्या उभ्या असल्यामुळे ट्रॅफिक जाम होऊ नये या उद्देशाने बहुधा हा अनोखा उपाय शोधून काढला आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @ravihanda या एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. “बंगळुरूमधील किमती खरोखरच गगनाला भिडल्या आहेत. पार्किंगसाठी प्रतितास १००० रुपये घेण्यात येत आहेत”; अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे. पार्किंगसाठी हा दर पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देताना दिसून आले आहेत.