कुत्रा हा माणसाचा सर्वात जवळचा प्राणी समजला जातो. जो मालक आपल्याला जेवूखाऊ घालतो त्याच्याशी मरेपर्यंत इमान राखायचं हे त्या मुक्या प्राण्याला चांगलं माहिती आहे. या बदल्यात मालकाकडून प्रेमाची अपेक्षा या मुक्या जीवाला असते. मात्र काही लोक या मुक्या जीवांशी वागताना आपल्यातली माणूसकी विसरतात.
असाच एक चीड आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात एका निदर्यी मालकानं आपल्या पाळीव कुत्र्याला रस्त्यात सोडूनच पळ काढलेला दिसत आहे. सीसीटीव्हमध्ये कैद झालेला हा सारा प्रकार इंग्लडमधला असल्याचं समजत आहे. पाळीव कुत्र्याला फिरवण्याच्या बहाण्यानं या मालकानं त्याला रस्त्यावर आणले. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्यानं कुत्र्याचा बेड रस्त्याच्या कडेला टाकला, कुत्र्यालाही तिथेच सोडलं आणि पळ काढला.
मालकाचं हे वागणं पाहून गोंधळून गेलेल्या कुत्र्यानं मालकाकडे परत जाण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या या निदर्यी माणसानं कुत्र्याला गाडीत घेतलं नाही. मालकाकडे जाण्याची त्याची केवीलवाणी धडपड अत्यंत हृदयद्रावक होती. सध्या या कुत्र्याला एका प्राणीप्रेमी संस्थेनं ठेवून घेतलं आहे. तसेच सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे या मालकाचा शोधही घेतला जात आहे.