Dead Mouse Found in Barbeque Nation Veg Meal Box : रोज घरचे जेवण खाऊन कंटाळा येत असल्याने अनेक जण हॉटेलमध्ये जातात. पण ग्राहक ज्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमधून विश्वासाने जेवण ऑर्डर करतात, तेच रेस्टॉरंट अनेकदा ग्राहकांच्या जीवाशी खेळ करीत असल्याचे दिसून येते. असाच एक प्रकार मुंबईत समोर आला आहे. एका ग्राहकाने हॉटेलमधून ऑर्डर केलेल्या जेवणात चक्क मेलेला उंदीर सापडल्याची बाब उघडकीस आली आहे. मुंबईतील ‘बार्बेक्यू नेशन रेस्टॉरंट’मध्ये हा जीवघेणा प्रकार घडला आहे. ‘बार्बेक्यू नेशन रेस्टॉरंट’मधून मागवलेल्या ऑर्डरमधील दाल मखली खाल्ल्यानंतर त्या ग्राहकाची प्रकृती खालावली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रेस्टॉरंटच्या जेवणात सापडला मेलेला उंदीर
प्रयागराजहून मुंबईत आलेले वकील राजीव शुक्ला हे रिपन पॅलेस नावाच्या हॉटेलमध्ये थांबले होते. ८ जानेवारीच्या रात्री ते पार्सल घेण्यासाठी वरळीतील बार्बेक्यू नेशन या आलिशान रेस्टॉरंटच्या आऊटलेटवर पोहोचले. तेथे त्यांनी जेवणाची ऑर्डर पार्सल घेतली. यावेळी ऑर्डर केली गेलेली ‘दाल मखनी’ थोडी खाल्ल्यानंतर पार्सलच्या डब्यात त्यांना मेलेला उंदीर दिसला. त्याचा त्यांनी फोटो काढून सोशल मीडियावरही पोस्ट केलाय. या दाल मखनीमुळे शुक्ला यांची तब्येत इतकी खालावली की, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तीन दिवस ते रुग्णालयाच्या खाटेवर पडून होते. सर्वांत निराशाजनक बाब म्हणजे त्या व्यक्तीची तक्रार तर घेतली गेली नाहीच; परंतु या गंभीर प्रकारासंदर्भात असूनही एफआयआर दाखल करून घेतलेला नाही.दरम्यान तक्रारदार राजीव शुक्ला यांनी याप्रकरणी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट केली आहे.
या घटनेबाबत रुग्ण राजीव शुक्ला यांनी सांगितले की, त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात ‘बार्बेक्यू नेशन’चे मालक, व्यवस्थापक आणि शेफ यांच्याविरोधात तक्रार नोंदवली; परंतु पोलिसांनी त्या रेस्टॉरंटविरोधात एफआयआर दाखल केला नाही. संबंधित रेस्टॉरंटवर कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून अजिबात मदत मिळाली नाही, असा त्यांचा आरोप आहे. दुसरीकडे राजीव शुक्ला यांना रेस्टॉरंटचे जेवण खाऊन विषबाधा झाली; ज्यामुळे त्यांना महापालिकेच्या बी.वाय.एल. नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तीन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.
या घटनेसंदर्भात ‘बार्बेक्यू नेशन रेस्टॉरंट’कडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. रेस्टॉरंटचे प्रवक्ते म्हणाले, “आम्हाला राजीव शुक्ला नावाच्या व्यक्तीकडून तक्रार आली आहे की, त्यांना आमच्या एका रेस्टॉरंटमधून ८ जानेवारी २०२४ रोजी ऑर्डर केलेल्या जेवणात मेलेला उंदीर सापडला. या प्रकरणाची आम्ही अंतर्गत तपासणी केली, तेव्हा आउटलेटमध्ये तसा कोणताही निष्काळजीपणा आढळून आला नाही. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासणीही करून घेतली आहे; परंतु आम्हाला तसा कोणताही प्रकार आढळला नाही. पण संबंधित अधिकाऱ्यांना पुढील तपासणी / ऑडिटसाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू.”
तक्रारदार राजीव शुक्ला यांनी रेस्टॉरंटमधून व्हेज क्लासिक रेग्युलर मिल बॉक्स ऑर्डर केला होता; ज्याची किंमत ६२९ रुपये होती. खाद्यपदार्थ कितीही महाग वा स्वस्त असला तरी त्यातून मेलेला उंदीर बाहेर पडणे ही बाब ग्राहकांच्या आरोग्याशी रेस्टॉरंट कसे खेळत आहे, हे दाखवून देते.