चॉकलेट्ससाठी फक्त लहान मुलेच काहीही करू शकतात असा जर तुमचा समज असेल तर तो चूकीचा आहे. चॉकलेट्स अशी गोष्ट आहे जिने लहानगेच काय पण अगदी वृद्धांना पण वेड लावले आहेत. सध्या अशाच चॉकलेट वेड्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या चॉकलेट वेड्याने चॉकलेटच्या मोहापायी पार्किंगमधल्या गाडीची काच फोडली आणि त्यातून चॉकलेट्स पळवले. इतकेच नाही तर चोरी केल्यानंतर गाडीमालकाला एक पत्रही लिहून ठेवले. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मॅनहॅटनमधल्या एका कॉलेजच्या बाहेर हंटर जॉबीनीसने आपली गाडी पंधरा मिनिटांसाठी पार्क केली होती. पण पंधरा मिनिटांनी परत आल्यानंतर त्यांच्या गाडीची काच कोणीतरी फोडली होती. त्यांच्या गाडीतून कोणत्याही मौल्यवान वस्तू गायब न होता फक्त काही चॉकलेट्स गायब झाले होते. इतकेच नाही तर या चोराने एक पत्रही त्यांच्या गाडीत ठेवले होते. ‘मला किट-कॅट खूपच आवडते. तुमच्या गाडीत ठेवलेले चॉकलेट पाहून ते खाण्याचा मोह अनावर झाला. पण गाडी लॉक होती. शेवटी नाईलाजाने मी गाडीच्या काचा फोडल्या’ असे पत्र त्याने लिहले. हंटरने हे पत्र सोशल मीडियावर टाकल्यानंतर ते चांगलेच व्हायरल झाले आहे. किट-कॅट चोरणा-या या अजब चोराची सध्या चर्चा रंगली आहे.