Worlds First Zero Cement Stone House : आपलेही एक सुंदर आलिशान घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेक जण हे स्वप्न सत्यात उतरवतात; तर काही जण त्यासाठी प्रयत्नशील असतात. असे घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिमेंट, रेती, विटा, लोखंडी खांब, सळ्या व माती यांची गरज असते. या वस्तूंशिवाय घरे बांधणे केवळ अशक्य आहे. पण, एका पठ्ठ्याने ही गोष्ट आता शक्य करून दाखवलीय. या पठ्ठ्याने चक्क सिमेंट, रेती, विटांशिवाय एक आलिशान बंगला बांधलाय. हा बंगल कुण्या एका राजाच्या आलिशान राजवाड्यापेक्षा कमी नाही. तुम्हीही या आलिशान बंगल्याचा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित व्हाल.

हा आलिशान अनोखा बंगला बेंगळुरूमधील एका व्यक्तीने बांधला आहे, जो आता अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या बंगल्याबद्दल असे म्हटले जाते की, सिमेंट, रेती, विटांशिवाय दगडांपासून बांधलेले हे जगातील पहिले घर आहे. हे घर मजबूत असल्याने ते दीर्घकाळ टिकाणारेदेखील आहे.

प्रियम सारस्वत नावाच्या एक कंटेंट क्रिएटरने त्याच्या @priyamsaraswat इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये तो बेंगळुरूमधील या आलिशान बंगल्याची टूर करवताना दिसतोय, जो पूर्णपणे दगडांनी बांधलेला आहे. या घराच्या बांधकामात सिमेंट किंवा काँक्रीटचा थोडासाही वापर करण्यात आलेला नाही.

या होम टूरमध्ये कंटेंट क्रिएटर या आलिशान बंगल्याच्या मालक आणि आर्किटेक्चरची ओळख करून देतोय. या आलिशान दगडी घराच्या मालकाने दावा केला आहे की, हे जगातील पहिले सिमेंटशिवाय बांधलेले दगडी घर आहे. हे घर केवळ टिकाऊच नाही, तर त्याचे आयुष्य हजार वर्षांहून अधिक आहे.

घर बांधणाऱ्या आर्किटेक्चरचे म्हणणे आहे की, या घराची रचना इंटरलॉकिंग तंत्राद्वारे ग्रे ग्रॅनाइट आणि सँडस्टोन दगडांचा वापर करून केली गेली आहे. यासाठी कोणत्याही सिमेंट, टाइल्सचा, तसेच दगड चिकटवण्यासाठी लिक्विड किंवा ब्लास्टिंग पद्धतीचा वापर केलेला नाही.

प्राचीन मंदिरांप्रमाणेच इंटरलॉकिंग तंत्रज्ञानाचा वापर करून घरे बांधण्याची ही कल्पना आजच्या काळात खूपच अनोखी वाटू शकते. इंटरलॉकिंग पद्धतीमध्ये दगडांमध्ये सिमेंट, प्लास्टर किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या लिक्विडचा वापर केला जात नाही. ही एक पर्यावरणपूरक आणि सस्टेनेबल टेक्निक आहे, जी पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही.

सिमेंटशिवाय दगडांपासून बांधलेले हे आलिशान घर अनेकांना फार आवडले आहे. या व्हिडीओवर आता युजर्सदेखील वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिलेय, “अद्भुत! प्राचीन भारतीय मंदिरांप्रमाणे हे घर हजार वर्षांहून अधिक काळ टिकेल.” दुसऱ्याने मजेदार पद्धतीने घराचे कौतुक केले आणि लिहिले, “भारतात आणखी एक ताजमहाल.”